जळगाव : जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील रोझोदा येथील रहिवासी वृद्ध दांपत्याची हत्या झाल्याचा प्रकर आज सकाळी उघडकीस आल्यामुळे खळबळ माजली आहे.
ओंकार पांडुरंग भारंबे (९०) व त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (८५) असे हत्या झालेल्या वयोवृद्ध दांम्पत्याचे नाव आहे. हत्या झालेले दाम्पत्य ज्या परिसरात रहात होते तो भाग सध्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यत आले आहे. त्यामुळे या भागात दररोज वैद्यकीय अधिकारी नागरिकांची तपासणी करण्यासाठी नित्यनेमाने येत असतात.
नेहमीप्रमाणे आज सकाळी वैद्यकीय अधिकारी परिसरातील नागरिकांच्या तपासणीसाठी आले होते. त्यांना भारंबे दाम्पत्य रहात असलेल्या घराचा दरवाजा किंचितसा उघडा दिसला मात्र वैद्यकीय अधिका-यांना आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून अत प्रवेश केला असता दोघे भारंबे पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले.
हा भयावह प्रकार उघडकीस येताच त्यांनी तात्काळ सावदा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक राहूल वाघ यांना कळवला. माहिती मिळताच स.पो.नि. राहुल वाघ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाला पोलिस उप विभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांनी भेट देवून तपासकामी सपोनि राहुल वाघ यांना योग्य त्या सुचना दिल्या. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी दाखल झाले होते. तसेच सावदा पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.