पाठलाग करणारा पोलिस दारु विक्रेत्याकडून ठार

बुलढाणा : अवैध दारु विक्रेत्याचा पाठलाग करणा-या पोलिसास आपल्या जीवाला मुकावे लागल्याची घटना बुलढाणा जिल्ह्याच्या अंढेरा येथे घडली. आपला पाठलाग करत असल्याचे समजताच अवैध दारु विक्रेत्याने पोलिसाच्या दुचाकीला लाथ मारली. ताबा सुटल्याने पोलिस कर्मचा-याची दुचाकी झाडावर आदळली. त्यात एक पोलिस कर्मचारी जागीच ठार तर सह कर्मचारी गंभीर जखमी झाला. मिसळवाडी शेळगाव आटोड रस्त्यावर घडलेल्या या घटनेने बुलढाणा जिल्ह्यात खळबळ माजली आहे. दारु विक्रेत्यांची मुजोरी वाढल्याचे या घटने वरुन दिसून येते.

भागवत गिरी असे ठार झालेल्या पोलिस कर्मचा-याचे तर रामेश्वर आंधळे असे गंभीर जखमी पोलिस कर्मचा-याचे नाव आहे. दोघे कर्मचारी गस्त घालत असतांना त्यांना अवैध देशी दारुचे बॉक्स वाहून नेणारा विक्रेता संजय शिवणकर दिसून आला. दोघा पोलिस कर्मींनी त्याचा पाठलाग केला असता ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाईला सुरुवात केली. मयत भागवत गिरी याचा मृतदेह तातडीने चिखली येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. जबर जखमी रामेश्वर आंधळे यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारुची विक्री जोमात सुरु असल्याचे या निमीत्ताने बोलले जात आहे. पोलिस निरीक्षक रुपेश शक्करगे हे या पोलिस स्टेशनला नव्याने हजर झाले आहेत. त्यांनी गुन्हेगारांवर जरब बसवण्याची मागणी होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह अंढेरा पोलिसांच्या पथकाने दारु विक्रेता संजय शिवणकर याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here