जळगाव : खावटी प्रकरणात दाखल वकीलपत्र मागे घेण्यास नकार देणाऱ्या भुसावळ येथील अँड. प्रवीण कोळी यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची घटना मंगळवारी श्रीनगर परिसरात घडली. बचावासाठी आलेल्या त्यांच्या आईवर देखील संशयिताने चाकू हल्ला केला. या घटने प्रकरणी अँड. प्रवीण कोळी यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला हल्लेखोर विकास धांडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटने प्रकरणी भुसावळ बार असोसिएशनने निषेध व्यक्त केला आहे. वकिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित करण्यात आला असून संबंधितावर कठोर कारवाईची मागणी देखील करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील श्रीनगर परिसरात राहणारे अँड. प्रवीण कोळी यांनी विकास धांडे यांच्याविरुद्ध खावटी प्रकरणी वकीलपत्र दाखल केले होते. या केसची तडजोड करण्याच्या तयारीने विकास धांडे हे अँड. प्रवीण कोळी यांच्या घरी गेले होते. मात्र अँड. कोळी यांनी या केसचे वकीलपत्र मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे चिडून जाऊन विकास धांडे यांनी अँड. कोळी यांच्यावर चाकू हल्ला केला. अँड. कोळी यांच्या बचावासाठी त्यांची आई मध्ये आली असता त्यांच्यावर देखील चाकू हल्ला झाला. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा तपास सुरू आहे.