जळगाव : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 19 वर्षापासून फरार बंदी कैदीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. गोकुळ रावण वाघ असे जेरबंद केलेल्या फरार बंदी कैदीचे नाव आहे. धुळे तालुका पोलीस स्टेशनला दाखल खूनाच्या गुन्ह्यातील गोकुळ वाघ हा शिक्षा बंदी होता. सन 2006 मध्ये तो शिक्षा रजेवर गावी आला होता. मात्र रजा संपल्यानंतर देखील तो शिक्षा भोगण्यासाठी कारागृहात हजर झाला नव्हता. त्यामुळे मेहुणबारे स्टेशनला त्याच्याविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गोकुळ वाघ हा त्याची ओळख लपवून पुणे येथे रहात होता. त्याबाबत खात्री करण्या कामी गोपनीय बातमीदार नियुक्त करण्यात आला होता. फरार गोकुळ वाघ हा धुळे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास समजली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, सफौ विजयसिंग पाटील, हे.कॉ. सुधाकर अंभारे, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, दिपक चौधरी आदींनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील कारवाई कामी त्याला मेहुणबारे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. मेहुणबारे पोलिसांनी त्याची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.