नंदुरबार : सुनेसोबत असलेल्या अनैतिक संबंधात मुलाचा अडसर दूर करण्यासाठी त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना नंदुरबार जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील मंडारा या गावी उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच सुनेच्या मदतीने मुलाची हत्या केल्याचे उघडकीस आल्याने समाजमन ढवळून निघाले आहे. सुन आणि तिचा सासरा अशा दोघा संशयितांविरुद्ध अक्कलकुवा पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकलाल ईश्वर वसावे असे मयत तरुणाचे नाव आहे. इश्वर दिल्या वसावे व त्याची सून अशा दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार इश्वर वसावे आणि त्याच्या सुनेत अनैतिक संबंध होते. या संबंधात इश्वर वसावे याचा मुलगा सुकलाल याचा अडसर येत होता.
त्यामुळे दोघांनी 24 मार्च रोजी घरात कुणी नसतांना सुकलालचा गळा दाबून खून केला. सुकलालच्या छातीत वेदना होत असल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे त्यांनी गावक-यांना सांगितले. मयत सुकलालच्या आईने तिचा पती आणि सुन अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी करीत आहेत.