चारित्र्याच्या संशयातून सोमनाथचे सुटले भान — पत्नी शीतलला ठार करताना झाला तो बेभान

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): राजेश खन्ना – मुमताज अभिनीत “आप की कसम” हा चित्रपट सन 1974 मधे प्रदर्शित झाला. संशय मनुष्याला कशाप्रकारे रसातळाला नेतो याचे वास्तव या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. संशयाला औषध नसते. चुकीचा संशय हा मनुष्याला आतून पूर्णपणे पोखरुन टाकतो. संशयी मनुष्याला कितीही समजावून सांगितले तरी त्याचा संशयी स्वभाव सहजासहजी सुटत नाही. त्यातून एखाद्या दिवशी अनर्थ घडतो. संशयाच्या कचाट्यातून मनुष्य बाहेर पडून भानावर येतो तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असते. चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्यात घडली.

जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा या गावी सोमनाथ सोनवणे हा तरुण त्याच्या परिवारासह रहात होता. मोल मजुरी करून परिवाराचा गाडा हाकणारा सोमनाथ हा सुशील पत्नी, एक मुलगा व एक मुलगी अशा चौकोनी अर्थात “हम दो – हमारे दो”  अशा सुखी कुटुंबाचा धनी होता. लग्नानंतर सोमनाथ आणि त्याची पत्नी शितल यांचा संसार सुखाने सुरु होता. बघता बघता त्यांचा संसार बहरत गेला. त्यांच्या संसार वेलीवर सिद्धू  नावाचा मुलगा आणि प्रिया नावाची मुलगी असे दोन अपत्य आले. बघता बघता सिद्धू दहा वर्षाचा आणि प्रिया सहा वर्षाची झाली. दोघांचा संसार तसा सुखाने सुरु होता. मात्र का कुणास ठाऊक सोमनाथच्या मनात त्याची पत्नी शितलच्या चारित्र्याविषयी संशय येण्यास सुरुवात झाली.

तो पत्नी शितलवर चारित्र्याचा संशय घेऊ लागला. या संशयातून तो शीतलला शिवीगाळ करु लागला. सुरुवातीला केवळ शिवीगाळ करणारा सोमनाथ त्याची पत्नी शितलला मारहाण देखील करु लागला. आज ना उद्या सोमनाथच्या वागण्यात आणि संशयी स्वभावात सुधारणा होईल अशी खुळी आशा शितल बाळगून होती. मात्र दिवसेंदिवस त्याचा हा त्रास वाढतच गेला. दिवसागणिक सोमनाथचे वागणे बिघडले होते. कामावरुन घरी आला म्हणजे सोमनाथचे शितलला शिवीगाळ व मारहाण करण्याचा त्रास वाढतच होता. शितलला होणारी शिवीगाळ व मारहाण त्याची निष्पाप मुले मुकाट्याने बघत होती. आपल्या आईला होणारी मारहाण दोन्ही मुकाट्याने बघण्याशिवाय दोन्ही मुले काहीच करु शकत नव्हती.

चारित्र्याच्या संशयावरुन होणारा त्रास असह्य झाला म्हणजे शितल हा प्रकार तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या कानावर घालत असे. शितलचे गावातच राहणारे दोघे भाऊ आणि वडील असे सर्वजण सोमनाथची समजूत घालण्यासाठी त्याच्या घरी येत असत. सर्वजण आपापल्या परीने त्याला समजावून सांगत असत. शितलला विनाकारण चारित्र्याच्या संशयावरुन शिवीगाळ आणि मारहाण करु नको असे सर्वजण त्याला जीव तोडून सांगत होते. मात्र काही दिवस सोमनाथ निट वागत असे. काही दिवस झाले म्हणजे परत त्याचे नेहमीचे वागणे सुरु होत असे.

Pawan Desale police inspector

25 मार्च रोजी नेहमीप्रमाणे सोमनाथने त्याची पत्नी शितलसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे  तिची सासु बानुबाई सोनवणे व तिचा दिर मंगेश सोनवणे असे दोघे जण शितलच्या घरी हनुमंतखेडा या गावी सोमनाथला समजावण्यासाठी आले होते. 

त्यानंतर 26 मार्च रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास शितलचा दहा वर्षाचा मुलगा सिद्धु याने गावात राहणा-या त्याच्या मामाच्या अर्थात भाऊसाहेब पवार यांच्या घरी धाव घेतली. भल्या पहाटे धापा टाकत आलेल्या सिद्धुने त्याच्या मामाच्या घराचे दार ठोठावण्यास सुरुवात केली.

सिद्धूचा मामा भाऊसाहेब पवार याने डोळे चोळत उठून दार उघडले असता दारात त्याचा भाचा अर्थात शितलचा मुलगा सिद्धु घाबरलेल्या अवस्थेत उभा होता. त्याच्या मनगटाजवळ जखम झालेली होती. त्या जखमेतून रक्त निघत होते. घाबरलेल्या सिद्धुने त्याचे मामा भाऊसाहेब पवार यांना कसे बसे सांगितले की आई शितलला त्याचे वडील सोमनाथ यांने कु-हाडीने मारहाण केली आहे. कु-हाडीचे घाव तोंडावर बसल्यामुळे तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे. काही वेळातच शितलची सासु बानुबाई ही देखील लागलीच भाऊसाहेबच्या घरी हजर झाली.

आल्या आल्या तिने भाऊसाहेबला त्याची रिक्षा बाहेर काढण्यास सांगितले. सोमनाथने शितल आणि सिद्धु या दोघांवर कु-हाडीने हल्ला केल्याचे तिने भाऊसाहेबला कथन केले. क्षणाचाही विलंब न करता भाऊसाहेबने त्याची रिक्षा शितलच्या दाराशी आणली. सर्वांनी घरात जावून पाहीले असता शितलच्या जबड्याला जबर दुखापत झालेली होती. तिच्या जबड्यातून रक्त निघत होते. या घटनेची माहिती समजताच गावात राहणा-या शितलच्या मोठ्या बहिणीचे पती शालिक सोनवणे हे देखील हजर झाले.

सर्वांनी मिळून शितलला रिक्षात कसेबसे बसवले. सर्वजण जखमी शितलला घेऊन रिक्षाने धरणगाव पोलिस स्टेशनला हजर झाले. पोल्सि स्टेशनला घडलेला प्रकार त्यांनी कथन केला. पोलिस स्टेशनच्या वतीने मेडीकल मेमो घेत सर्वजण स्थानिक सरकारी रुग्णालयात आले. त्याठिकाणी जखमी शितल व तिचा मुलगा सिद्धु या दोघांवर वैद्यकीय उपचार  करण्यात आले.

चारित्र्याच्या संशयातून सोमनाथ याने पत्नी शितल आणि तिच्या मुलावर कु-हाडीने प्राणघातक हल्ला केल्याचे बानुबाईने सर्वांना सांगितले. दरम्यान तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गंभीर शितलला पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. शितलची अवस्था गंभीर असल्यामुळे तिचे ऑपरेशन करावे लागेल असे तेथील डॉक्टरांनी उपस्थित नातेवाईकांना सांगितले. सर्वानुमते शितलला एका खासगी रुग्णालयात नेऊन त्याठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

दि. 27 मार्च च्या रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास शितलचे उपचारादरम्यान निधन झाले. 28 मार्चची पहाट बघणे शितलच्या नशिबी नव्हते. 27 मार्चची रात्र तिच्या जीवनातील अखेरची आणि काळरात्र ठरली. ती मरण पावल्याचे समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांमधे एकच शोककळा पसरली. तिचे दोन्ही भाऊ हंबरडा फोडून रडू लागले. आपले मामा रडत असल्याचे बघून शितलचा जखमी मुलगा सिद्धु आणि मुलगी प्रिया असे दोघे देखील धाय मोकलून रडू लागले. दोघा निष्पाप मुलांचे मातृछत्र हरपले होते.

sandip patil

या घटनेप्रकरणी मयत शितलचा भाऊ भाऊसाहेब पवार याने दिलेल्या खबरीनुसार धरणगाव पोलिस स्टेशनला सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्याविरुद्ध शितलच्या खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. भाग 5 गु.र.नं. 127/2025 भारतीय न्याय संहीता 103 (1), 118(1) प्रमाणे हा गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश नानाजी वाघ यांच्याकडे देण्यात आला. स.पो.नि. निलेश वाघ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार, पो.हे.कॉ. महेंद्र बागुल, पोहेकॉ राजु कोळी, समाधान भागवत, पोकॉ संदीप पाटील आदींच्या पथकाने मयत शितलचा पती सोमनाथ सोनवणे यास तो पळून जाण्याच्या बेतात असतांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निलेश नानाजी वाघ करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here