जळगाव : नवजात अर्भकाला कापडात गुंडाळून, सिमेंटच्या दोन रिकाम्या गोण्यांमध्ये बांधून ते झुडूपात फेकून दिल्याचा प्रकार भागपूर धरणाजवळ शुक्रवारी उघडकीस आला. त्या नवजात अर्भकाला बेळी येथील रहिवासी माधव झटके यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्या बाळाचा मुंबईतील एका दाम्पत्याने स्वीकार केला.
नशिराबादजवळ भागपूर प्रकल्पाचे काम सुरु आहे. शुक्रवारी सकाळी भागपूर परिसरात माधव झटके हे वाहन चालक किरण जानकीराम ताठे यांच्यासोबत गेले होते. त्यावेळी त्यांना नवजात बालकाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी झाडाझुडपात कानोसा घेतला असता, त्यांना सिमेंटच्या गोणीसह कापडामध्ये एक नवजात अर्भक आढळून आले.
त्या अर्भकास त्यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय उपचारानंतर रितसर प्रक्रिया करून बाळाला मुंबई येथील एका दाम्पत्याला देण्यात आल्याचे समजते.