जळगाव : केळी वाहतूक करणा-या ट्रक चालकास अडवत त्याच्याकडून पैशांची मागणी करत तडजोडीअंती नाखुशीने पन्नास रुपये स्विकारणा-या पोलिस नाईकासह त्याच्या साथीदार पोलिस बांधवांवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. या तिघा पोलिसांची पाचोरा उप विभागीय पोलिस अधिका-यांमार्फत खात्यांतर्गत प्राथमिक चौकशी केली जाणार आहे.
पवनकुमार विष्णू पाटील असे पन्नास रुपये स्विकारणा-या पोलिस नाईकाचे नाव आहे. सहायक फौजदार गुलाब हिलाल मनोरे व पोहेकॉ चेतन चंद्रमोहन सोनवणे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. पाचोरा पोलिस स्टेशनला नेमणूकीला असलेले पोलिस नाईक पवनकुमार पाटील, सहायक फौजदार गुलाब मनोरे, पोहेकॉ चेतन सोनवणे या तिघांवर वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
रविवार 30 मार्च रोजी कजगाव कडून पाचोरा मार्गे जामनेरच्या दिशेने जाणा-या केळी वाहतूक करणा-या ट्रक चालकास पोलिस नाईक पवनकुमार पाटील याने अडवले होते. ट्रक चालकाकडून पवनकुमार पाटील याने पैशांची मागणी करत ट्रक अडवून ठेवला होता. ट्रक चालकाने बराच वेळ घासाघीस करत वेळ मारुन नेली. दरम्यानच्या कालावधीत टपावर बसलेल्या प्रवाशाने या घटनेचा आणि संवादाचा व्हिडीओ त्याच्या मोबाईलमधे शुट केला. अखेरीस पोलिस नाईक पवनकुमार पाटील याने ट्रक चालकाकडून नाखुशीने पन्नास रुपये स्विकारले. पैसे स्विकारल्याचा प्रकार मोबाईलमधे कैद झाला. त्यानंतर हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आणि चर्चेत आला.
तडजोडीअंती आमची केवळ पन्नास रुपयांची लायकी आहे का? असा सवाल पोलिस नाईक पवनकुमार पाटील याने ट्रक चालकाला केला होता. पैसे घेत असतांना रस्त्याच्या पलीकडे उभे असलेले दोघे पोलिस देखील मालवाहू वाहन अडवत असल्याचे चित्रीकरण एकाने केले होते. त्यामुळे ते देखील संशयाच्या भोव-यात आले. या घटनेची व प्रकाराची दखल पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घेतली. तिघांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.