जळगाव : रिक्षात बसलेल्या वयोवृद्ध प्रवाशास लुटणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. या गुन्ह्याच्या प्रकटीकरणाकामी नेत्रम कॅमे-यांची मदत घेण्यात आली. गुन्हे प्रकटीकरण लवकरात लवकर होण्याकामी तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अधिकाधिक नागरिकांनी, व्यावसायीकांनी शहरात महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते पोलिस दलाच्या नेत्रम प्रोजेक्टला जोडून सहकार्य करावे असे आवाहन या निमीत्ताने करण्यात आले आहे.
दि. 29 मार्च रोजी एक जण नांदुरा येथे जाण्यासाठी अजिंठा चौफुली परिसरात बसची वाट बघत उभा होता. त्या इसमाजवळ असलेल्या पिशवीत 25 हजार रुपयांची रोकड होती. त्याला हेरुन एक रिक्षा चालक त्याच्या दोन साथीदार प्रवाशांसह त्या ठिकाणी आला. आम्ही खामगाव येथे जात आहोत. तुम्हाला कुठे जायचे आहे अशी विचारणा त्या प्रवाशाला करण्यात आली. त्यावर प्रवाशाचा होकार मिळताच त्याला अगोदरच रिक्षात बसलेल्या दोन प्रवाशांच्या मधे बसवण्यात आले.
काही अंतर पुढे गेल्यानंतर प्रवाशांच्या रुपात बसलेल्या रिक्षा चालकाच्या साथीदारांनी त्या प्रवाशासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आम्हाला सिटवर व्यवस्थित बसता येत नाही. तुम्ही दुस-या वाहनाने या असे म्हणत त्या प्रवाशाला रस्त्यावर उतरवून देण्यात आले. रिक्षातून खाली उतरल्यानंतर आपल्या बॅगेतील पैसे गायब झाले असल्याचे त्या प्रवाशाच्या लक्षात आले. त्याने ती रिक्षा थांबवण्यासाठी आवाज दिला. मात्र रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा उभी केली नाही.
या घटने प्रकरणी प्रवाशाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या गुन्हे शोध पथकातील पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोना प्रदिप चौधरी, पोकॉ राहुल रगडे, पोकॉ विशाल कोळी, पोकॉ रतन गिते, गणेश ठाकरे आदींनी नेत्रम प्रोजेक्टचे सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज तपासले.
या सीसीटीव्ही फुटेजमधे पथकाला एक संशयीत रिक्षा आढळली. त्या रिक्षाचा चालक वसीम कय्युम खाटीक (मास्टर कॉलनी जळगांव) यास ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी करण्यात आली. त्याने आपला गुन्हा कबुल करत या गुन्ह्यातील दोघा साथीदारांची नावे कबुल केली. त्यात वसीमचा साथीदार तौसीफ खान सत्तार खान (रामनगर मेहरुण जळगाव) व एका अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले. तौसीफ खान हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुद्ध जबरी चोरी, चोरी असे तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यातील 25 हजार रुपयांची रोकड व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक प्रदीप चौधरी करत आहेत.