रामबंधु मसाल्यांची चोरी उघडकीस – चालकासह चौघे जेरबंद   

जळगाव : रामबंधु मसाला डिलरकडे पुर्वी काम करत असलेल्या चालकाने त्याच्या तिघा साथीदारांच्या मदतीने केलेली चोरी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवघ्या 48 तासांच्या आत उघडकीस आणली आहे. चौघा चोरट्यांना 8 लाख 35 हजार रुपये किमतीच्या मसाल्यांच्या 71 गोण्या, गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहनांसह अटक करण्यात आली आहे. अनिल रमेश पाटील (रा. खडका – भुसावळ) असे अटकेतील चालकाचे तर बाबुराव त्रंबक सुरवाडे (पळासखेडा – जामनेर), शिवा सुरेश पाटील (खडका ता. भुसावळ) आणि राहुल बाविस्कर (खडका ता. भुसावळ) अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत.

अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची जळगाव एमआयडीसी परिसरात श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स नावाची कंपनी आहे. या कंपनीकडे जळगाव, धुळे, नंदुरबार अशा तिन जिल्ह्यांसाठी रामबंधु मसाले या उत्पादनाची डिलरशीप आहे. 27 मार्च रोजी रात्रीच्या वेळी त्यांच्या कंपनीच्या गोडाऊनमधून रामबंधु मसाल्याचा 8 लाख 35 हजार रुपये किमतीचा 71 गोण्यांचा साठा चोरी झाला होता. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस उप अधिक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोकॉ राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिध्देश्वर डापकर, पोकॉ रतन गिते आदींचे एक पथक तयार करण्यात आले. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधे पाहणी केली असता चोरट्यांनी आपली ओळख लपवण्याची सोय करुन ठेवली होती. त्यांनी आपल्या तोंडाला रुमाला बांधून कारचा वापर करुन चोरी केली होती.

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने चोरीच्या गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि अज्ञात चेह-यांची ओळख पटवण्यात पोलीस पथकाला यश आले. फिर्यादी अतुल मुळे यांच्याकडे पंधरा पुर्वी कामाला असलेला वाहन चालक अनिल रमेश पाटील हाच या चोरीचा म्होरक्या असल्याचे निष्पन्न झाले. त्याला शिताफीने ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. या गुन्ह्यात त्याने त्याच्या तिघा साथीदारांची नावे उघड केली.

त्याच्यासह त्याचे साथीदार बाबुराव त्रंबक सुरवाडे, शिवा सुरेश पाटील आणि राहुल बाविस्कर यांना देखील पोलिस पथकाने शिताफीने वेळेत जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल, गुन्ह्यात वापरलेल्या कार जप्त करण्यात आल्या आहेत. चौघा चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक चंद्रकांत धनके व पो कॉ योगेश घुगे करत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here