दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध दाखल खंडणी, अ‍ॅट्रॉसीटीची तक्रार निकाली

जळगाव : जळगाव येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या विरुद्ध दाखल खंडणी व अ‍ॅट्रॉसीटीची तक्रार निकाली काढण्यात आली आहे. गुप्ता यांच्याकडून खंडणी मागण्याचा कोणताही प्रकार निष्पन्न झाला नसल्याचे जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी स.पो.नि. संतोष चव्हाण यांनी लेखी स्वरुपात तक्रारदार मुकुंदा भागवत सोनवणे यांना कळवले आहे.

जळगाव येथील रहिवासी मुकुंदा सोनवणे यांनी पोलिस अधिक्षक यांच्याकडे दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी लेखी तक्रार केली होती. दीपककुमार गुप्ता हे आपणास खंडणी मागतात, दमदाटी व बदनामी करतात अशा आशयाची ती तक्रार होती. या तक्रारीची जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि. संतोष चव्हाण यांनी चौकशी केली. दीपककुमार गुप्ता यांचा अंगरक्षक दिनेश प्रकाश जगताप आणि तक्रारीचे घटनास्थळ असलेल्या नगर भुमापन कार्यालयाचे अधिकारी पंडीत सुरसिंग पाटील आदींचे जवाब घेतले असता मुकुंदा सोनवणे यांच्या तक्रारीत तथ्य नसल्याचे आढळून आले आहे.  

शैलेंद्र काशिनाथ सपकाळे यांनी 27 फेब्रुवारी 2025 रोजी पोलिस अधिक्षकांकडे दीपककुमार गुप्ता यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशा आशयाची तक्रार केली होती. दीपककुमार गुप्ता यांनी कोणत्याही प्रकारची जातीवाचक शिवीगाळ अथवा अपशब्द वापरल्याचे निष्पन्न झाले नसल्याचा अहवाल स.पो.नि. संतोष चव्हाण यांनी तक्रार निवारण कक्ष अधिकारी अर्ज शाखा पोलिस अधिक्षक कार्यालयाकडे दाखल केला आहे.

आपणास वारंवार खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचे सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि प्रांत विनय गोसावी यांच्या गैर कारभाराविषयी आपण बोलत असल्यामुळे आपणास खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा हा प्रयत्न होत असल्याचे गुप्ता यांचे म्हणणे आहे. पोलिस प्रशासनाने या दोन्ही प्रकरणात दिलेला अहवाल आणि दोन खोट्या गुन्ह्यातून आपण बाहेर आल्याच्या उदाहरणातून काय सिद्ध होते असा गुप्ता यांचा प्रश्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here