जळगाव : फैजपूर येथील अवैध कत्तलखाना सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे व त्यांच्या पथकाने नेस्तनाबूत केला आहे. फैजपूर येथील मिल्लतनगर मस्जीदजवळ शेख नईम उर्फ नम्मा अब्दुल रहिम कुरेशी यांच्या घराच्या बाजूला पत्र्याच्य शेडमधे अवैध कत्तलखाना सुरु असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना समजली होती. धडाडीचे पोलिस अधिकारी रामेश्वर मोताळे यांनी लागलीच आपल्या पथकाच्या मदतीने त्याठिकाणी सापळा रचून पंचांच्या मदतीने खात्री करुन कायदेशीर कारवाई केली.
घटनास्थळी ईकराम शेख नईम कुरेशी, वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी आणि शेख मुस्तकीम शेख कलीम हे तिघे जण आढळून आले. तसेच या ठिकाणी त्यांच्या कब्जात 220 किलो वजनाचे गोवंश मांसाचे तुकडे, सुमारे 23 किलो वजनाचे बैलाचे कातडे, तराजू काटा, वजन मापे, मांस कापण्यासाठी लागणारी लोखंडी सुरी व एक लाल रंगाचा जीवंत गोवंश जातीचा गो-हा असा मुद्देमाल आढळून आला. तातडीने याठिकाणी पशुवैद्यकीय अधिका-यांना पाचारण करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोहेकॉ रविंद्र काशिनाथ मोरे यांनी सरकारतर्फे फिर्यादी होत फैजपूर पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद गाभणे करत आहेत.