अनैतिक संबंधाचा वाद होता मनात – गावठी पिस्टल लपवून ठेवले रिक्षात

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): गावातील तरुणाच्या पत्नीसोबत असलेले अनैतिक संबंध व त्यातून निर्माण होणा-या वादाचा वचपा काढण्यासाठी लढवलेली शक्कल पोलिस तपासात उघडकीस आली आहे. विवाहीतेच्या पतीच्या रिक्षात प्रियकराने त्याच्या मित्राकरवी  गावठी पिस्टल लपवून ठेवले. पोलिस मित्राच्या माध्यमातून रिक्षात गावठी पिस्टल व दोन जीवंत काडतूस असल्याची गोपनीय माहिती शनीपेठ पोलिसांपर्यंत पोहोचवण्यात आली. अशा प्रकारे विवाहीतेच्या पतीला पोलिस कारवाईच्या जाळ्यात अडकवण्याचा प्लॅन उघडकीस आला आहे.

गेल्या महिन्यात 28 मार्च रोजी दुपारच्या वेळी जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात एका रिक्षात गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुस सापडल्याची घटना घडली होती. शनीपेठ पोलिसांच्या पथकाने त्या रिक्षातील गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुस जप्त करत रितसर कारवाई केली. मात्र पोलिस तपासात वेगळेच सत्य बाहेर आले.

जळगाव तालुक्यातील त्या रिक्षाचालकाच्या पत्नीचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्यातून त्या रिक्षा चालकाचे आणि त्या प्रियकर तरुणाचे नेहमी वाद होत असत. त्या वादाचा वचपा काढण्यासाठी तायडे आडनावाच्या प्रियकराने ऋषीकेश नावाच्या मित्राच्या मदतीने विवाहीतेच्या रिक्षा चालक पतीच्या रिक्षात गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुस लपवले. याबाबत एका पोलिस मित्राच्या माध्यमातून ही गोष्ट शनीपेठ पोलिसांपर्यंत व्यवस्थीत पोहोचवण्यात आली.

संगनमताने कट रचून रिक्षा चालकास अग्नीशस्त्र गुन्ह्यात पद्धतशीरपणे अडकवणा-या दोघा मित्रांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच रिक्षा चालकाचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या पथकातील सपोनि साजीद मंसुरी, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोना किरण वानखेडे, पोकॉ विकी इंगळे, पोकॉ रविंद्र साबळे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास शनिपेठ पो.स्टे. चे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here