जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): शेक्सपिअरच्या “हॅमलेट” या नाटकावर आधारीत “दास्तान” नावाचा स्व. दिलीपकुमार अभिनीत चित्रपट सन 1972 मधे प्रदर्शित झाला. त्यानंतर याच कथानकावर आधारीत स्व. रिशी कपूर अभिनीत “कर्ज” व त्यानंतर अनेक चित्रपट तयार झाले. आपल्या पत्नीला पर पुरुषासोबत चाळे करतांना बघून त्या पुरुषाच्या मनाची काय अवस्था होते, त्याच्या मनाची कशी घालमेल होते ते या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. “न तु जमी के लिये है ना आसमा के लिये” असे गीत या प्रसंगाला अनुसरुन “दास्तान” या चित्रपटात “स्व. दिलीपकुमार” यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

आजच्या कलीयुगात अशाच स्वरुपाच्या घटना कुठे ना कुठे घडत असतात. शांत डोक्याचे कित्येक पुरुष अशा प्रसंगात पत्नीला घटस्फोट देऊन अथवा तिच्यापासून विभक्त राहून आपले जीवन व्यतीत करतात. भडकलेल्या डोक्याचे कित्येक पुरुष रागाच्या भरात काहीतरी चुकीचे पाऊल उचलतात. एकतर ते स्वत: आत्महत्या करतात नाहीतर पत्नी अथवा तिच्या प्रियकराचा जीव घेतात. त्यातून त्यांना जीवनभर त्रास भोगावा लागतो. शांत डोक्याने निर्णय घेतल्यास मनुष्याचे जीवन सुखकर होते. मात्र घाईगर्दीत अथवा रागाच्या भरात केलेले कृत्य जीवनाची दुर्दशा करते. अशाच स्वरुपाची एक घटना जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात घडली.


रावेर तालुक्यातील आभोडा या गावी संतोष शामराव तायडे हा त्याची पत्नी आशाबाईसोबत कुडाच्या झोपडीत रहात होता. उसतोडीचे काम करुन संतोष आपल्या संसाराचा गाडा हाकत होता. मिळेल त्या ठिकाणी कामाला जावून तो चरितार्थ चालवत होता. कामानिमीत्त घराबाहेर असतांना आपली पत्नी पर पुरुषासोबत बोलते असा संतोषला संशय येत असे. कामावरुन घरी आल्यानंतर तो या कारणावरुन पत्नी आशाबाईसोबत वाद घालत असे. चारित्र्याच्या संशयातून पती पत्नीत वादाची ठिणगी पडत असे. त्यामुळे त्यांच्या संसारात कटूता आली होती.
नेहमीप्रमाणे काम आटोपून संतोष 30 मार्चच्या रात्री उशीरा घरी परत आला. चाळीसगाव येथील एका उसतोड ठेकेदाराकडून संतोषने पाच हजार रुपये उधार आणले होते. उधार आणलेले पाच हजार रुपये त्याने पत्नी आशाबाईला सांभाळण्यास दिले. तिने ती रक्कम त्याच्या समोरच भांड्यांच्या रॅकवर ठेवली. रात्र बरीच झाली होती. त्यामुळे दोघे पती पत्नी झोपी गेले.

रात्री एक ते दिड वाजेच्या सुमारास संतोषला अचानक जाग आली. त्याने उठून पाहिले असता त्याची पत्नी आशाबाई जागेवर नव्हती. त्याचवेळी त्याचे लक्ष रॅकवर गेले. त्याठिकाणी त्याने दिलेली पाच हजाराची रक्कम देखील नव्हती. त्यामुळे तो आशाबाईचा शोध घेण्यासाठी घरातून बाहेर आला. त्यावेळी घराच्या मागील बाजूला असलेल्या शेतात त्याला आशाबाई कुणातरी पर पुरुषासोबत बोलतांना दिसली. रात्रीचा अंधार असल्यामुळे त्याला तो पर पुरुष नेमका कोण होता हे समजू शकले नाही.

आपली पत्नी एवढ्या रात्री पर पुरुषासोबत निर्जन स्थळी शेतात बोलत असल्याचे बघून संतोष चिडला. दोघांना रंगेहाथ पकडण्यासाठी संतोष त्याठिकाणी गेला. मात्र आशाबाईचा पती आपल्या दिशेने येत असल्याचे बघून तो पर पुरुष तेथून शिताफीने पळून जाण्यात यशस्वी झाला.
आशाबाई एकटीच त्याच्या तावडीत सापडली होती. त्याने तिला तो कोण होता असा दरडावून प्रश्न केला. त्यावर आशाबाई गप्प बसली. त्यानंतर त्याने तिला दिलेल्या पाच हजार रुपयांची विचारणा केली. त्यावर देखील बोलण्यास तिने टाळाटाळ केली. तो पर पुरुष कोण होता आणि दिलेले पाच हजार रुपये कुठे गेले या दोन प्रश्नांची उत्तरे आशाबाई देत नव्हती. त्यामुळे संतोषच्या मनातील असंतोष खदखद करत होता.


त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती एकटीच त्याच्याकडे पाठ फिरवून झोपी गेली. मात्र संतोषची झोप उडाली होती. त्याच्या डोळ्यातील झोप शेकडो मैल दूर पळाली होती. तो अस्वस्थ झाला होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. त्याची झोप उडवून आशाबाई मात्र शांतपणे झोपली होती ते बघून तो तिच्यावर आणखीनच चिडला होता. काही केल्या त्याला झोप येत नव्हती. त्याच्या मनाची घालमेल त्याला स्वस्थ बसू अथवा झोपू देत नव्हती. त्याच्या मनात सारखे सारखे त्या परपुरुषाचे आणि पाच हजाराचे विचार येत होते. तो कोण होता? हा एक प्रश्न त्याला सतावत होता. ज्याअर्थी तो कोण होता याचे उत्तर आशाबाई देत नव्हती त्याअर्थी नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे अशी त्याला शंका येत होती.
अखेर संतापाच्या भरात तो जागेवरुन उठला. पत्नी आशाबाई झोपेत असतांनाच तिला काही समजण्याच्या आत तो तिच्या अंगावर बसला. दोन्ही हातांनी त्याने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली. अचानक गळा आवळला जात असल्यामुळे आशाबाई पाय झाडू लागली. संतोष अंगावर बसून असल्यामुळे आशाबाई त्याला प्रतिकार करु शकत नव्हती. अखेर तिची प्रतिकार शक्ती संपली. तिने काही वेळाने तिचे प्राण सोडले. ती मरण पावली होती. ती मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतरच तो तिच्या अंगावरुन उठला.

त्यानंतर 1 एप्रिलच्या पहाटे त्याने रावेर पोलिस स्टेशन गाठले. तो सरळ पोलिस स्टेशनला हजर झाला. उपस्थित ठाणे अंमलदारास त्याने रात्रीची घटना कथन केली. स्वत: खूनी आपल्यासमोर हजर होऊन मी माझ्या पत्नीचा खून केला असल्याचे सांगत होता. त्याचे बोलणे ऐकून ठाणे अंमलदार देखील काही वेळ स्तब्ध झाले. त्यांनी लागलीच या घटनेची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांना दिली.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांनी पोलिस स्टेशन गाठले. संतोष तायडे यास पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल यांच्यासमक्ष हजर करण्यात आले. त्याच्याकडून पोलिस निरीक्षक डॉ. जायस्वाल यांनी सर्व घटनाक्रम ऐकून आणि समजून घेतला. त्यानंतर त्याला सोबत घेत पो.नि. डॉ. विशाल जायस्वाल व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील, महिला फौजदार दिपाली पाटील, हे.कॉ. ईश्वर चव्हाण, पोलिस नाईक कल्पेश आमोदकर, पोकॉ अतुल गाडीलोहार, पोकॉ मुकेश मेढे, पोकॉ संदीप पाटील, अभोडा गावातील काही महिला व पुरुष अशा सर्वांनी घटनास्थळ गाठले.
संतोष रहात असलेल्या कुडाच्या झोपडीत आशाबाई मयत अवस्थेत पडलेली होती. अभोडा गावचे पोलिस पाटील राजू तडवी यांना बोलावून घेण्यात आले. पत्नीची हत्या केल्याची कबुली देणा-या संतोषविरुद्ध पोलिस पाटील राजु तडवी यांनी रावेर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. संतोष पाटील यास अटक करण्यात आली. घटनास्थळ व मयताचा पंचनामा आदी कायदेशीर बाबी पुर्ण करण्यात आल्या. भाग 5 गु.र.न. 142/2025 भारतीय न्याय संहिता 103 (1) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.