ठाणे : अवघ्या ३५ हजार रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी दोघा साथीदारांच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती ठाण्याचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी आज दिली.
कर्जबाजारी झाल्यामुळे अक्षय डाकी या मित्राच्या गळयातील सोनसाखळीसाठी धनराज तरुडे (३३) याने दोरीने गळा आवळून त्याची हत्या केली होती. दोन मजूरांना प्रत्येकी पाच हजारांची सुपारी आरोपी धनराज तरुडे याने दिली होती. खूनातील सहभाग स्पष्ट झाल्यामुळे कृष्णा घोडके (२०) आणि चंदन पासवान (२०) या त्याच्या साथीदारांना देखील अटक करण्यात आली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून या हत्येचा सखोल तपास सुरु होता. हत्येचे नेमके कारण उघड होत नव्हते. खूनाचा मुख्य सूत्रधार धनराज हा किरकोळ कारणावरुन हत्या केल्याचे सांगून वेळ मारुन नेत होता.अक्षय डाकी (२०), वाघबीळ, ठाणे हा ४ सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्या बाबत कासारवडवली पोलीस स्टेशनला मिसींग दाखल करण्यात आली होती. सदर मिसींग त्याचे वडिल हेमंत डाकी यांनी दिली होती. ओवळा, पानखंडा, वाघबीळ भागात शोध घेऊनही त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळे त्याचा नक्कीच घातपात झाला असावा अशी शंका त्याच्या परिवाराने व्यक्त केली होती.
दोन पथकांकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. बेपत्ता अक्षय डाकी हा त्याचा मित्र धनराज याला भेटण्यासाठी नेहमी पानखंडा येथे येत असल्याची माहिती पोलिस पथकाला मिळाली होती. अक्षयची दुचाकी पानखंडा परिसरात मिळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी धनराजवर संशयाच्या भुमिकेतून लक्ष केंद्रीत केले. पोलिसांनी त्याला चौकशीकामी ताब्यात घेतले. तो सतत उडवाउडवीची उत्तरे देवून दिशाभूल करत होता. एका रिक्षा चालकाने ४ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता धनराज सोबत अक्षय गेल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यावेळी घरातून बाहेर जातांना २० लीटरचे पाण्याचे दोन रिकामे जार घेऊन रिक्षात बसलेल्या धनराजने एक वजनदार गोणी देखील घेतली होती. ही वजनदार गोणी अहमदाबाद हायवेनजीक ब्रिजवरुन खाडीतील पाण्यात त्याने फेकली होती. त्यानंतर तो धावतच रिक्षात येवून बसला होता.
या सर्व घटनाक्रमाच्या आधारे पोलिसांनी खाडीतून अक्षय डाकी याचा मृतदेह शोधून बाहेर काढला होता. ताब्यातील धनराज हा अगोदर केवळ किरकोळ कारणासाठी खून केल्याचे सांगत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला.
काही जणांचे उधारीने घेतलेले ३५ हजार रुपये त्याला फेडायचे होते. त्यासाठी अक्षयच्या गळयातील सोनसाखळी लांबवण्याचा कट धनराज याने रचला. त्यासाठी धनराजने त्याचा भाऊ कृष्णा घोडके (धानोरा, लातूर) व मित्र चंदन पासवान (ओवळा, ठाणे) यांची मदत घेतली. या कामासाठी दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचे त्याने कबुल केले होते. त्यांच्याच मदतीने धनराजने अक्षयला मारहाण केली होती. त्यानंतर दोरीच्या सहाय्याने अक्षयचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला.
टॅक्सी चालक असलेल्या धनराजला या खून प्रकरणी ७ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. कृष्णा व चंदन या दोघांना १० सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून अक्षयचा मोबाइल, चार तोळयांची सोनसाखळी व गुन्हयात वापरलेली नायलॉनची दोरी हस्तगत करण्यात आली.या खूनाच्या घटनेनंतर तीनच दिवसात धनराजला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे ज्या सोनसाखळीसाठी त्याने हा खून केला होता ती सोनसाखळी त्याला विक्री करता आली नाही. त्यामुळे त्याने दोघांना कबुल केलेले प्रत्येकी पाच हजार रुपये देखील देता आले नाही.
या हत्येचा तपास पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार, पोलीस निरीक्षक प्रदीप उगले, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, शीतल चौगुले, पालवे तसेच उपनिरीक्षक कुलदीप मोरे, रुपाली रत्ने, पोलीस हवालदार अंकुश पाटील, एस. बी. खरात, राजेंद्र चौधरी, चंद्रकांत गायकवाड, पोलीस नाईक राजकुमार महापुरे, पी. आर. तायडे, प्रविण घोडके, महेंद्र लिंगाळे, रवींद्र रावते, राहूल दबडे यांनी पुर्ण केला.