जळगाव : बनावट जन्म दाखले तयार करुन दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्यानंतर जळगावच्या शाहू नगर परिसरातील दोघा वकीलांना अटक करण्यात आली आहे. शेख मोहम्मद रईस मोहम्मद इद्रिस बागवान आणि शेख मोहसीन शेख सादीक मनियार अशी अटक करण्यात आलेल्या दोघा वकीलांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने तिन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नायब तहसीलदारांच्या फिर्यादीनुसार 4 एप्रिल रोजी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदे याबाबत माहिती दिली.
पाल्यांच्या विविध शैक्षणीक कामकाजासाठी संशयीत 43 जणांना जन्म दाखले हवे होते. या 43 जणांपैकी 35 जणांना जळगाव शहर पोलिस स्टेशनला चौकशीकामी बोलावण्यात आले होते. गुन्ह्याचे स्वरुप बघून हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. चौकशीकामी बोलावण्यात आलेल्या 35 जणांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दोघा वकीलांना जन्म दाखल्यांसाठी कागदपत्रे दिली होती. जन्म दाखले ज्या स्वरुपात असतात त्या स्वरुपाच्या नमुन्यात तहसीलदारांच्या नावाचा सही शिक्का वापरुन हे बनावट जन्म दाखले तयार करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे.