जळगाव : पाचोरा तालुक्यातील पिंप्री सार्वे या गावी सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने 7 एप्रिल रोजी चोरी झाले होते. या घटनेप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांच्या सहका-यांनी तपास लावला असून मुद्देमालासह चोरट्यास अटक केली आहे.
आनंदराव विठ्ठल पाटील यांच्या घराच्या पत्री खोलीतून सुमारे सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरी झाले होते. स.पो.निरी. प्रकाश काळे यांच्या पथकातील पो.उप.निरीक्षक प्रकाश पाटील, पो.हे.कॉ. नरेंद्र नरवाडे, पो.कॉ. अमोल पाटील, पो.कॉ. नामदेव इंगळे, पो.कॉ. ईमरान पठाण आदींच्या पथकाने सार्वे गावातील राजेंद्र किसन पाटील यास तपास व चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला.
राजेंद्र पाटील याच्या ताब्यातून चोरीच्या गुन्ह्यातील ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे, १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे नॅकलेस तसेच चांदीचे पायातील पैंजण असा सुमारे ४,८२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. राजेंद्र पाटील यास अधिक तपासकामी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. नरेंद्र नरवाडे करत आहेत.