घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) – अवैध वाळू वाहतुक करणारे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्त करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतुकदारांच्या गोटात खळबळ माजली आहे.
घोटी येथील मंडळ अधिकारी एम. झेड. गोहकार यांना समजलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता अवैध वाळू वाहतूकीचा प्रकार समोर आला. हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून घाटंजी तहसिल कार्यालयात जमा करण्यात आले आहे. जप्त ट्रॅक्टर गोविंदपुर येथील असल्याचे समजते.
घाटंजीचे तहसीलदार विजय साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली घोटी येथील मंडळ अधिकारी एम. झेड. गोहकार, कुर्ली येथील प्रभारी तलाठी डी. एम. किनाके, चिखलवर्धा येथील प्रभारी तलाठी आर. जी. राठोड, ताडसावळी येथील तलाठी आर.पी. कुमरे, कोतवाल गजानन गेडाम (चिखलवर्धा) आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.