जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): आपल्या मुलांचे आयुष्य सुखात जावे, त्यांना जीवनात विशेष श्रम पडू नये यासाठी काही पालक राबराब राबून चल – अचल संपत्ती जमवतात. अनेक पिढ्यांना वारसा हक्काने चल-अचल संपत्ती मिळत असते. मात्र हिच संपत्ती कित्येकदा वादाचे आणि हिंसेचे कारण देखील बनते. संपत्तीच्या वादातून कित्येक अप्रिय घटना घडतात. त्यात एकजण दुस-याच्या जीवावर उठतो आणि खूनासारखी घटना घडते. मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे केले तरी पुरेसे असते. मात्र वारसा हक्काची अथवा पालकांनी कष्टाने उभी केलेली संपत्ती नंतर वादाचे कारण होत असल्याच्या घटना आपण बघतो. मोठमोठ्या सुसंस्कृत घरांमधे देखील अशा वादाच्या घटना घडत असतात. त्यातून एकत्र कुटूंब विभक्त होतात. अशाच मालमत्तेच्या वादातून पित्याने आपल्याच थोरल्या मुलाची धाकट्या मुलाच्या मदतीने हत्या केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील बाळद या गावी घडली. भडगाव पोलिसांच्या सतर्कतेने या घटनेतील अपघाताचा बनाव आणि खूनाचा गुन्हा उघडकीस आला.

भडगाव तालुक्यातील बाळद खुर्द या गावी राजेंद्र रामचंद्र शिंदे हे आपल्या परिवारासह रहात होते. त्यांना भारत आणि बाळू अशी दोन मुले होती. भारत हा मोठा तर बाळू हा त्यांचा लहान मुलगा होता. राजेंद्र शिंदे यांचा लहान मुलगा बाळू हा नेहमी त्यांना त्यांच्या घराच्या वाटणीत जास्तीचा हिस्सा मागत असे. त्यातून तो नेहमीच त्याचे वडील राजेंद्र यांच्याशी वाद घालत असे. बाळूचा मोठा भाऊ भारत हा त्याला समजावण्यासाठी जात असे. त्यावेळी तो भारतचे देखील ऐकत नव्हता. त्यामुळे राजेंद्र शिंदे यांच्या घरातील वातावरण गढुळ झाले होते.

अखेर बाळूच्या जीवनातील 8 एप्रीलची अखेरची रात्र आली. या रात्री त्याच्याच जन्मदात्यासह मोठ्या भावाच्या हातून त्याला मरण आले. रात्री साडे नऊ ते पावणे दहा वाजेच्या सुमारास बाळूने त्याचे वडील राजेंद्र शिंदे यांच्यासोबत घराच्या वाटणीत जादा हिस्सा हवा या विषयावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच्या या नेहमीच्या वादाला त्याचे वडील आणि मोठा भाऊ असे दोघेही वैतागले होते.
घराबाहेर भर रस्त्यावर सुरु असलेल्या पिता पुत्रामधील भांडणाचा आवाज परिसरातील लोकांच्या कानावर पडू लागला. पिता पुत्राच्या वादात शब्दामागे शब्द वाढत होता. अखेर वैतागलेल्या राजेंद्र शिंदे यांनी संतापाच्या भरात बाळूला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तरीदेखील बाळू त्याचा घराच्या वाटणीतील जास्तीचा हिस्सा मागत असल्यामुळे राजेंद्र शिंदे आणि त्यांचा मोठा मुलगा भारत अजूनच संतापले. त्यांनी बाळूच्या चेह-यावर आणि छातीवर लाकडी दांडक्याने मारहाण सुरु केली. या मारहाणीत बाळूच्या डोक्यावर जबर मार बसल्यामुळे तो जमीनीवर कोसळला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होण्यास सुरुवात झाली. या प्रकाराची माहिती समजताच बाळद गावचे पोलिस पाटील सुनिल पाटील हे घटनास्थळी धावत आले. त्यांच्यासह गावातील इतरांनी जखमी बाळू शिंदे याला तातडीने भडगाव येथे सरकारी दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी बाळूला तपासून मयत घोषित केले.
या घटनेची माहिती पोलिस पाटील सुनिल पाटील यांनी लागलीच भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांना दिली. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार हे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळ आणि मृतदेहाची त्यांनी बारकाईने पाहणी केली असता त्यांना मयताच्या चेह-यावर आणि छातीवर मारहाण झाल्याच्या खुणा दिसून आल्या. बाळूच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासासाठी त्यांनी त्याचा मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकामी रवाना केला.


अधिक चौकशीकामी मयत बाळू शिंदे याचे वडील राजेंद्र शिंदे आणि त्याचा मोठा भाऊ भारत यांना पोलिस स्टेशनला बोलावण्यात आले. दोघांची सखोल चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी बाळूचा घरावरुन खाली पडल्याने अपघाती मृत्यु झाल्याचे सांगितले. मात्र दोघांची सखोल चौकशी करत गरजेनुसार त्यांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. अखेर दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. मयत बाळू हा त्याचे वडील राजेंद्र शिंदे यांना घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागत असे. 8 एप्रिल रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बाळूने वाद घालण्यास सुरुवात केली. त्याच्या नेहमीच्या त्रासाला वैतागून राजेंद्र शिंदे आणि भारत शिंदे या दोघा पिता पुत्रांनी मिळून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात त्याच्या डोक्यावर जबर मार बसल्यामुळे तो मरण पावला.


दोघा पिता पुत्राने आपला गुन्हा कबुल केल्यानंतरही बाळूचे कोणीही नातेवाईक पोलिस स्टेशनला तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. अखेर पोलिस पाटील सुनिल पाटील यांनी पुढाकार घेत राजेंद्र शिंदे आणि भारत शिंदे या दोघा पिता पुत्रांविरुद्ध बाळूच्या खूनाची फिर्याद दाखल केली. भाग 5 गु.र.न. 123/2025 भारतीय न्याय संहिता 103 (1), 115 (2), 352, 3 (5) प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना 9 एप्रिल रोजी अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावली. अपघाताचा बनाव करुन नामनिराळे राहण्याचा दोघांचा प्लॅन उघडकीस आला. अवघ्या एक तासात या घटनेतील संशयीत आरोपींना निष्पन्न करण्यात भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार व त्यांचे सहकारी यशस्वी झाले.


पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी सो, चाळीसगाव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, पोलिस उप अधिक्षक राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के, पोलिस उप निरीक्षक सुशील सोनवणे, पोहेकॉ मुकुंद परदेशी, नरेंद्र विसपुते, निलेश ब्राम्हणकार, पोलिस नाईक मनोज माळी, पोकॉ महेंद्र चव्हाण, दत्ता पाटील, संदिप सोनवणे, सुनिल राजपूत, प्रविण परदेशी, संभाजी पाटील (चालक) आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के करत आहेत.