घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी ते येळाबारा मार्गावरील कान्होबा टेकडी जवळील खुल्या जागेवर आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर सट्टा सुरु असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिका-यांना मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कान्होबा टेकडी परिसरात छापा टाकून चौघांना ताब्यात घेत त्यांच्या कब्जातील ४ मोबाईल, २ मोटार सायकल व रोख असा एकूण १ लाख ७१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हैद्राबाद विरुद्ध पंजाब या क्रिकेट मॅचवर भ्रमणध्वनी फोनच्या सहाय्याने लोकांकडून पैसे घेऊन क्रिकेट सट्टा घेणारे प्रतिक द्रोणा (वय २७, रा. अंबादेवी वार्ड, घाटंजी), शुभम खांडरे (वय २१, रा. राम मंदीर वार्ड, घाटंजी), कार्तिक धांदे (वय २१, रा. राम मंदीर वार्ड, घाटंजी) व प्रथमेश घुघाने (वय २३, रा. महात्मा गांधी वार्ड, घाटंजी) या चार आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कायदा १२ अ नुसार घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उप निरीक्षक धनराज हाके, जमादार सुधीर पांडे, उल्हास कुमरकुटे, सुनील खंडागळे, सुधीर पिदुरकर, रजनीकांत मडावी, शेख सलमान व नरेश राऊत आदींनी केली.