जळगाव– प्रपंचाला अध्यात्माची जोड असणे आवश्यक असून त्यासाठी सद्गुरुंचे आशीर्वाद पाठीशी हवेत. सद्गुरूंनी दिलेल्या नामस्मरणाचा विसर पडू नये अन्यथा त्याचा दोष शिष्यासह गुरूंनाही लागतो. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे देवाचिये द्वारी उभा क्षणभरी… या उक्तीप्रमाणे आपल्या दैनंदिन प्रपंचातून नामस्मरणासाठी काही क्षण जरूर काढावे असे प्रतिपादन अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान, अमळनेर-पंढरपूरचे विद्यमान गादीपती प. पु. प्रसाद महाराज यांनी केले. अमळनेरकर महाराज सेवा संघ जळगाव आयोजित प्रवचन, तुला, सेवाव्रती सन्मान, दर्शन व महाप्रसाद कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

जळगावातील पांझरापोळ संस्थानच्या गोशाळेत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात तुला करणाऱ्या यजमानांच्या संकल्पाने झाली. यानंतर ब्रह्मवृंदाने भद्र सूक्ताचे पठण केले. त्यानंतर बभळाज येथील विठ्ठल मंदिराचे पुजारी महेश जोशी गुरुजी यांचे संतांचे अध्यात्मिक व सामाजिक योगदान या विषयावर प्रवचन झाले. देवाला आपल्या सेवा कार्याचा हेवा वाटावा आणि त्याने आपले आभार मानले पाहिजे असे काम संत करतात. समाजातील समरसता, परस्पर सहकार्य व सौहार्द वाढीसाठीचे कार्य सर्वच संतांनी केल्याचे आपल्याला त्यांच्या चरित्रातून दिसून येईल असे ते म्हणाले. यासाठी सद्गुरू संत श्री. सखाराम महाराज यांच्यासोबतच्या वारीतील अनेक प्रसंग सांगितले. महाराजांचं महाराजपण कठीण असून ते संतच करू शकतात असेही ते म्हणाले.

पाच ज्येष्ठ सेवा सेवाव्रतींचा सन्मान – यानंतर वैदिक, धार्मिक, अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ व्रतस्थपणे आपले जीवनकार्य करणाऱ्या ज्येष्ठ सेवाव्रतींचा सद्गुरू प्रसाद महाराज यांच्या हस्ते वस्त्र, विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यात धरणगाव येथील संत सखाराम महाराज संस्थानच्या विविध उपक्रम गेल्या ६ दशकांपासून सेवा देणाऱ्या मुकुंद उपासनी, धुळे येथील वयाच्या १४ व्या वर्षांपासून कीर्तन करणाऱ्या कोमलसिंग बुवा राजपूत हेंद्रूणकर, चार दशकांहून अधिक काळ जळगावातील अप्पा महाराज समाधीची अर्चना करणारे मुकुंद धर्माधिकारी, नशिराबाद येथील श्रीराम मंदिराचे मंगल धर्माधिकारी तसेच जळगावातील समाजसेवी व यजुर्वेदीय-रुद्राष्टाध्यायी पुस्तकाचे लेखक प्रा. विलास जोशी यांचा सन्मान करण्यात आला. यानंतर प. पु. प्रसाद महाराजांनी सर्व भाविकांना आशीर्वचन दिले.
यानंतर जळगाव शहरातील मान्यवरांनी दिलेल्या विविध धान्याने महाराजांची तुला करण्यात आली. हे सर्व धान्य अमळनेर येथील वैशाख यात्रेसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर सर्व भाविकांनी महाराजांचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन सौ. पद्मजा जोशी यांनी केले. मानपत्राचे वाचन सौ. अदिती कुलकर्णी, सौ. वर्षा पाठक, सौ. विंदा नाईक व सौ. स्मिता कासार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केशव कोठावदे, डॉ. प्रमोद जोशी, सुशील नवाल, केदार देशपांडे, संजय नाईक, विवेक पुंडे, विशाल तारे, मकरंद पाठक, वैभव तरटे, अजय कुलकर्णी, सौ. स्वाती कुलकर्णी, संजय मुसळे, सुनील वैद्य, कृष्णाजी कुलकर्णी, विवेक जावळे, प्रवीण कोठावदे, संदीप कासार, शामभाऊ कोठावदे, उल्हास सुतार, शशिकांत चौधरी, संदीप जोशी आदी सेवेकऱ्यांनी सहकार्य केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.