जळगाव – मौलानांचा पगार वाढवण्यास विरोध केल्याच्या रागातून वाद घालत चौघांनी एकास जबर मारहाण केली. या घटने प्रकरणी जखमीने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव तालुका पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमान पटेल, समीर पटेल, समशेर पटेल, अफताब पटेल (चौघे रा. ममुराबाद ता जि जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
मोहम्मद हनीफ शेख मुनाफ हे ममुराबाद येथील रहिवासी असून ते स्थानिक मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य आहेत. अरमान पटेल हे देखील मुस्लीम पंच कमेटी मध्ये सदस्य आहेत. रमजान ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर झालेल्या बैठकीत मौलानांचा पगार वाढविण्यासंदर्भात चर्चा झाली होती. यावेळी मोहम्मद हनीफ शेख मुनाफ यांनी या पगार वाढीबाबत विरोध दर्शवला होता. मोहम्मद हनीफ शेख मुनाफ यांचा विरोध बघून अरमान पटेल यांना राग आला. त्यांनी मोहम्मद यांना 13 एप्रिल रोजी रात्री यासंदर्भात चर्चेसाठी बोलावले.
यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर अरमान पटेल, समीर पटेल, समशेर पटेल व आफताब पटेल अशा चौघांनी मोहम्मद हनिफ शेख मुनाफ यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. मोहम्मद हनिफ त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते मात्र कुणीही त्यांचे म्हणणे ऐकून घेत नव्हते. समशेर पटेल याने लोखंडी पाईपाने मोहम्मद मुनाफ यांच्या डोक्यात पाईप मारला. त्यावेळी मोहम्मद यांचा मुलगा भांडण सोडवण्यासाठी आला असता त्याला देखील चौघांनी चापटाबुक्क्यानी मारहाण केली.
समशेर याच्याकडून झालेल्या हल्ल्यात मोहम्मद जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे बघून चौघे पळून गेले. जखमी मोहम्मद हे त्यांच्या मुलासह जळगाव तालुका पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकामी आले. पोलिसांनी मेडिकल मेमो दिल्यानंतर ते शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्याकामी दाखल झाले. या घटने प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार पुढील तपास सुरू आहे.