जळगाव : चार जीवंत काडतुसासह गावठी पिस्टलची खरेदी विक्री करणा-या दोघांना शनीपेठ पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. राकेश दिलीप भावसार असे खरेदीदाराचे तर प्रसाद संदीप महाजन असे विक्रेत्याचे नाव आहे. 54 हजार रुपयात या अवैध गावठी कट्ट्याची खरेदी विक्री झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
राकेश दिलीप भावसार हा तरुण शनीपेठ पोलिस स्टेशन हद्दीतील ज्ञानदेव नगर – काशिनाथ नगर परिसरात गावठी पिस्टलसह वावरत असल्याची माहिती शनीपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ युवराज कोळी, पोहेकॉ रविंद्र बोदवडे, पोहेकॉ शशिकांत पाटील, पोकॉ अनिल कांबळे, पराग दुसाने आदींना पुढील कारवाईकामी रवाना केले.
ज्ञानदेव नगर परिसरातून राकेश भावसार यास शिताफीने ताब्यात घेत त्याच्या कब्जातील एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा) व जीवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. हस्तगत करण्यात आलेले देशी बनावटीचे पिस्टल राकेशने त्याचा मित्र प्रसाद संदीप महाजन याच्याकडून खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. प्रसादने हे पिस्टल कुठून आणले, त्याचे पिस्टल खरेदी विक्रीचे कनेक्शन कुठे आहे हे चौकशीत निष्पन्न होणार आहे. अटकेतील दोघांविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला गु.र.नं. 85/2025 भारतीय हत्यार कायद्यासह म.पो. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करत आहेत.