जळगाव : चोरांना चोरीच्या कामात मार्गदर्शन आणि सहकार्य करणारा पीएसआय प्रल्हाद मांटे यास जालना पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी निलंबीत केले आहे. जळगाव येथे एका कामानिमीत्त तो तपास पथकासोबत आला होता. तपास पथक जालना येथे परत गेल्यानंतर देखील तो जालना येथे परत गेला नाही. मात्र तो चोपडा येथे सोनसाखळी चोरांच्या पथकात मार्गदर्शकाच्या रुपात सामील झाला. पीएसआय प्रल्हाद मांटे याच्या चौकशीकामी जालना पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी चौकशी समिती नियुक्त केली आहे.
चोपडा शहर पोलिसांनी सोनसाखळी चोरी प्रकरणात ज्या टोळीला पकडले त्या टोळीतील काही आरोपींना जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलिसांनी यापुर्वी अटक केली आहे. याच सदर बाजार पोलिस स्टेशनला पकडला गेलेला पीएसआय प्रल्हाद मांटे हा कार्यरत होता. त्याची या टोळीतील चोरांसोबत मैत्रीचे संबंध असल्याचे म्हटले जात आहे. या मैत्रीतूनच तो चोपडा बस स्थानकात चोरीच्या गुन्ह्यात सहभागी झाला असतांना चोपडा शहर पोलिसांच्या हाती लागला आणि त्याचे खरे रुप जगासमोर आले.