जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): दुबईला पळून गेलेल्या एम डी ड्रग्ज विक्रेता आरोपीसोबत तब्बल 352 वेळा मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात असणारे पोलिस उप निरीक्षक दत्ता पोटे सध्या चर्चेत आले आहेत. तथापी त्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचा खुलासा पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केला आहे. मात्र तरीदेखील या वृत्तामुळे जनमानसात पोलिसांच्या प्रतिमेबद्दल चर्चा मात्र सुरु झाली आहे. अरबाज नावाचा एमडी ड्रग्ज विक्रेता फरार असून तो दुबईला पळून गेला असल्याचे म्हटले जात आहे.

चोरीचे दागिने हस्तगत केल्यानंतर ते मुळ मालकाला परत देण्याचे फोटो सेशन वजा कार्यक्रम करुन पोलिस दलाची कमी अधिक प्रमाणात बिघडलेली प्रतिमा दुरुस्त करण्याचा प्रयत्न तत्कालीन पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांच्या कार्यकाळात झाला होता. पोलिस दलाची प्रतिमा चांगली रहावी यासाठी वरिष्ठ पातळीवर आटोकाट प्रयत्न सुरु असतांना काही कर्मचारी ते काम पंक्चर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नुकत्याच समोर आलेल्या दुस-या घटनेतून दिसून येते.
स्थानिक गुन्हे शाखेतील गजानन देशमुख व संदीपाल जाधव या दोघा कर्मचा-यांनी पेट्रोल आणि गुटखा विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून हप्ता घेतल्याचा व्हिडीओ थेट पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाला. त्यानंतर दोघांची बदली करण्यात आली. गजानन देशमुख या कर्मचा-याची अप डाऊन साठी सोयीची असलेल्या रेल्वे रुटवरील पाचोरा येथे तर गायक संघपाल तायडे या कर्मचा-याची जामनेर तालुक्याच्या सिमेवरील फत्तेपूर या निर्जन स्थळी बदली करण्यात आली आहे. खासगी नोकरीत अशा स्वरुपाचा गैरप्रकार समोर आला असता तर मालकाने कर्मचा-याला कामावरुन काढूनच टाकले असते, मात्र मायबाप सरकार केवळ बदली करते असे भोळीभाबडी आम जनता म्हणते.
352 वेळा फरार ड्रग्ज विक्रेता अबरार आणि पीएसआय दत्ता पोटे यांच्यातील मोबाईल संभाषणात आक्षेपार्ह काहीही नसल्याचे पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी म्हटले आहे. तथापी त्यांची स्थानिक गुन्हे शाखेतून दहा पावलावरील कंट्रोल रुममधे गेल्या एक महिन्यापासून बदली झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेत काय गैर प्रकार सुरु असतात, दिव्याखाली कुठे अंधार आहे? याची पडताळणी या शाखेच्या पोलिस निरीक्षकांनी करावी अशी आम जनतेची मागणी आहे.