जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): असे म्हणतात की एक पिढी राबराब राबते, कष्ट करते. आपल्या मुलांच्या कल्याणासाठी ती पिढी चल-अचल संपत्ती तयार करते. ती संपत्ती पुढच्या पिढ्यांना उपयोगी ठरते. पुढील सात पिढ्या आरामात बसून जगण्याइतपत संपत्ती एखादी पिढी दुस-या पिढीसाठी तयार करते. त्यानंतर पुर्वजांनी कमावलेल्या संपत्तीवरच एखाद्या नव्या पिढीचे घरदार चालते. अगदी बसून, एषो आरामात खाण्या इतपत वारसा हक्काने मिळालेल्या संपत्तीवर एखादी नवी पिढी जगते. एखादी पिढी पुर्वजांकडून मिळालेल्या संपत्तीचे जतन करुन आपली कल्पकता वापरुन त्या संपत्तीत अजून वाढ करते. मात्र कालपरत्वे कालचक्रानुसार एखादी पिढी अशी येते की पुर्वजांनी कमावलेली आणि वारसाहक्काने मिळालेली संपत्ती रसातळाला नेते. ही संपत्ती अनेकदा वादाचे कारण बनते. या संपत्तीवरुन घरात वाद होतात. हे वाद कित्येकदा न्यायालयात जातात. वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवरुन घरात निर्माण होणारे वाद नव्या पिढीच्या विनाशाचे कारण बनते. या वादातून खूनासारखी एखादी अप्रिय घटना देखील घडते.

याउलट काही कल्पक दृष्टीचे लोक आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना केवळ त्यांच्या पायावर उभे करुन सक्षम करतात. त्यांना चांगले संस्कार देतात आणि पुढील आयुष्यासाठी मनापासून भरभरुन आशिर्वाद आणि प्रेम देतात. संस्काराच्या, भक्कम शिक्षणाच्या, स्वकष्टाने अथवा नशिबाने मिळालेल्या रोजगाराच्या बळावर आणि पुर्वजांचे आशिर्वाद आणि पुण्याईवर अनेक पिढ्या आपले सामर्थ्य जगाला दाखवून देतात. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यात पुर्वजांनी कमावलेल्या शेतजमीनीच्या वादातून एका तरुणाने त्याच्या चुलत भावाचा खून केल्याची घटना घडली. शेतजमीनीचा वाद या खूनाच्या घटनेसाठी माध्यम ठरला.
जळगाव जिल्हा आणि मध्य प्रदेश राज्याच्या सिमेवर वसलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात टाकळी हे गाव आहे. या गावातील चव्हाण परिवारात रामसिंग, जयसिंग आणि जगन हे तिन भाऊ रहात होते. त्यापैकी रामसिंग आणि जयसिंग हे दोघे भाऊ काही वर्षापुर्वी मयत झाले आहेत. या तिघा भावांपैकी केवळ जगन चव्हाण हा एकच भाऊ आजच्या घडीला हयात आहे. स्वर्गवासी रामसिंग चव्हाण यांना चार मुले आहेत. संजय रामसिंग चव्हाण, अनिल रामसिंग चव्हाण, गोविंदा रामसिंग चव्हाण आणि सुनिल रामसिंग चव्हाण अशी त्यांची नावे आहेत. स्व. रामसिंग चव्हाण यांचा हयात असलेला भाऊ जगन चव्हाण यांना प्रविण जगन चव्हाण आणि राहुल जगन चव्हाण ही दोन मुले आहेत. चव्हाण परिवाराची परंपरागत शेती मुक्ताईनगर तालुक्यातील महालखेडा आणि टाकळी शिवारात आहे.




ठरल्याप्रमाणे वडीलोपार्जीत परंपरागत शेती जगन चव्हाण यांच्यासह त्यांची मुले आणि स्व. रामसिंग व स्व. जयसिंग या दोघांची मुले कसत होते. काळाची पावले पुढे पुढे सरकत होती. परिवारातील सदस्यांची संख्या वाढत होती. काळानुरुप प्रत्येकाला आपल्या अधिकाराची जाणीव होण्यास सुरुवात होते. त्याला चव्हाण परिवारातील नव्या पिढीचा देखील अपवाद नव्हता. स्व. रामसिंग चव्हाण यांची मुले सुनिल, अनिल, गोविंदा व संजय हे जगन चव्हाण यांच्याकडे शेतजमीनीच्या वाटणीवरुन वाद घालत होते. गेल्या महिन्यात हा वाद जणूकाही विकोपाला गेला होता. रामसिंग चव्हाण यांचा मुलगा सुनिल याने या वादात पुढाकार घेतला होता. पुढाकार घेत सुनिल रामसिंग चव्हाण याने त्याचे काका जगन चव्हाण यांच्याशी मोठ्या प्रमाणात वाद घालण्यास सुरुवात केली होती. सुनिल हा त्याचे काका जगन चव्हाण आणि काकु कौशल्याबाई यांना धमकावत होता. आपल्या आई – वडिलांना आपला चुलत भाऊ सुनिल धमकावत असल्याचे बघून प्रविण यास त्याचा प्रचंड राग आला. त्यामुळे जगन चव्हाण यांचा मुलगा प्रविण याने त्याचा चुलत भाऊ सुनिल याचा काटा काढण्याचे त्याच दिवशी मनाशी निश्चीत केले. त्यादृष्टीने त्याने मनाशी नियोजन सुरु केले.
आपल्या मनात अजिबात राग नाही असे दर्शवत प्रविण याने सुनिलला 25 मार्च 2025 रोजी सायंकाळी शेतात मांसाहारी पार्टी करण्याच्या बहाण्याने बोलावले. दुपारी तिन वाजता प्रविणचा निरोप मिळाल्यानंतर सुनिलने पार्टीला जाण्याचे नियोजन सुरु केले. पार्टीला येतांना चिकन घेऊन येण्यासाठी प्रविणने सुनिल यास दोनशे रुपये दिले. पोळ्या आणि दारुची व्यवस्था प्रविणने केली. अशा प्रकारे सुनिलला पार्टीच्या बहाण्याने बोलावून त्याला जीवानिशी संपवण्याचे प्रविणचे छुपे नियोजने सुरु होते.

ठरल्यानुसार रात्रीच्या वेळी महालखेडा शिवारातील शेतात दोघांनी मद्यसेवनासह मांसाहारी जेवणाची पार्टी सुरु केली. प्रविण याने सुनिल यास मुद्दाम जास्त दारु पाजण्यास सुरुवात केली. वेळोवेळी तो सुनिल यास पेगवर पेग पिण्यास भाग पाडत होता. कसेबसे जेवण आटोपल्यानंतर जवळच असलेल्या विहीरीच्या कडेवर सुनिल पाणी पिण्यासाठी गेला. खाली बसून सुनिल ओंजळीने पाणी पित असल्याची संधी साधत प्रविण त्याच्या मागच्या बाजुने गेला. पाठमो-या अवस्थेतील सुनिलच्या डोक्यात प्रविणने भलामोठा दगड आपटला. मनात साचलेल्या रागातून प्रविणने सुनिलच्या डोक्यावर एका पाठोपाठ दगडाचे दोन ते तिन घाव घातले. मद्याच्या नशेतील सुनिल अचानक दगडाने डोक्यात झालेल्या हल्ल्याने विव्हळला. मद्याच्या नशेमुळे त्याची प्रतिकार शक्ती अगोदरच कमी झाली होती. त्यातच हा जीवघेणा हल्ला त्याच्यावर झाला.


सुनिलच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाल्यानंतर तो जागेवरच कोसळला. काही क्षणातच तो मरण पावला. सुनिल मरण पावल्याचे लक्षात आल्यानंतर प्रविण मनातून घाबरला. सुनिलच्या डोक्यात मारलेला रक्ताने माखलेला दगड आणि रक्ताने माखलेली माती त्याने विहीरीत टाकून दिली. सुनिलच्या डोक्यातून निघत असलेले रक्त बघून प्रविणने त्याचा मृतदेह पालथा केला. आता सुनिलच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची त्यासाठी त्याने पुढील नियोजन सुरु केले.
सुनिलच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकामी मदतीसाठी प्रविणने त्याचा परिचीत असलेल्या बाळू ममराज जाधव यास फोन करुन टाकळी फाट्यावर बोलावले. प्रविणच्या निरोपानुसार बाळू जाधव हा टाकळी फाट्यावर आला. मात्र दरम्यानच्या कालावधीत प्रविण हा वडगाव महादेव मंदीराजवळ आला. त्यामुळे त्याने बाळूला वडगाव महादेव मंदीराजवळ बोलावून घेतले. वडगाव महादेव मंदीराजवळ बाळूने आणलेली मोटार सायकल उभी करुन प्रविणने बाळूला घटनास्थळी सुनिलच्या मृतदेहाजवळ पायी पायी नेले.


घटनास्थळी सुनिलचा मृतदेह बघून बाळू काही क्षण विचारात पडला. त्यावेळी प्रविणने बाळूला सांगितले की मी सुनिलचा शेतजमीनीच्या वादातून दगडाने ठेचून खून केला आहे. ज्या दगडाने मी सुनिलला ठार केले तो रक्ताने माखलेला दगड आणि माती विहीरीत फेकून दिली आहे. सुनिलचा अपघाती मृत्यू झाला असे भासवण्याचे प्रविणने अगोदरच ठरवले होते. त्यासाठी त्याने ठिकाण देखील बघून ठेवले होते. त्या ठिकाणी मयत सुनिलला त्याच्याच मोटार सायकलच्या सिटवर मध्यभागी बसवून नेण्यात आले. चालकाच्या रुपात पुढे प्रविण, मध्यभागी मयत सुनिलला बसवून शेवटी बसलेल्या बाळूने पकडून ठेवण्याचे काम केले. अशा प्रकारे ट्रिपल सिट आल्यानंतर मयत सुनिलचा मृतदेह त्याठिकाणी खाली उतरवण्यात आला.
हा अपघाती मृत्यु आहे असे लोकांना वाटावे यासाठी प्रविणने सुनिलचे डोके दोन ते तिन वेळा जोरजोरात दगडावर आपटले. त्यानंतर त्याची मोटार सायकल त्याच्याच अंगावर टाकून प्रविण आणि बाळू पायी पायी वडगाव शिवारातील महादेव मंदीराजवळ चालत आले. त्याठिकाणी उभी असलेली बाळूची मोटार सायकल प्रविणने ताब्यात घेतली. बाळूला मुक्ताईनगर येथे सोडण्यासाठी प्रविण त्याची मोटार सायकल चालवू लागला. वाटेत कुंड ते जुना मलकापुर दरम्यान पुर्णा नदीच्या बॅक वॉटर पुलावरील रस्त्यावर प्रविण याने रक्ताने माखलेला शर्ट अंगातून काढला. अगोदरच सोबत आणलेला शर्ट त्याने परिधान केला. रक्ताने माखलेले कपडे प्रविण याने एका पिशवीत टाकून ते सोबत घेतले.


बाळु जाधव यास मुक्ताईनगर येथे त्याच्या घरी सोडल्यानंतर प्रविण टाकळी येथे जाण्यास निघाला. टाकळी येथे घरी जातांना वाटेत जुन्या कुंड रस्त्याने एक पुलाजवळ रक्ताने माखलेले कपडे प्रविण याने धुतले. त्याठिकाणी धुतलेले कपडे थोडा वेळ वाळवून ते कपडे चिंचखेडा शिवारातील जंगलात त्याने लपवून ठेवले. त्यांनतर जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात प्रविण आपल्या घरी परत आला.
दुस-या दिवशी 26 मार्च 2025 रोजी सकाळी सुनिलचा अपघाती मृत्यु झाल्याची वार्ता गावात पसरली. माहिती समजताच गावक-यांनी घटनस्थळी धाव घेत हळहळ व्यक्त केली. सकाळी सहा वाजताच या घटनेची माहिती वा-यासारखी पसरली. मयत सुनिलचा भाऊ संजय याला देखील याबाबत माहिती समजली. माहिती मिळताच तो देखील त्याचा मुलगा अक्षय याच्यासोबत घटनास्थळी हजर झाला. आपल्या भावाचा मृतदेह बघून संजयला रडू अनावर झाले. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते आणि त्यांचे सहकारी देखील घटनास्थळी हजर झाले. हा अपघाती मृत्यु नसून ही हत्या असल्याची शंका पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पारखी नजरेने हेरली.

मयत सुनिल चव्हाण याचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. आपल्यावर कुणाचा संशय नको म्हणून प्रवीण हा देखील रुग्णालयात साळसुदासारखा हजर होता. तसेच सुनिलच्या अंत्यविधीच्या ठिकाणी प्रविण आणि बाळू असे दोघे हजर होते. उत्तरीय तपासणीनंतर सुनिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत सुनिलच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या दप्तरी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.
वैद्यकीय अहवालानुसार सुनिलचा मृत्यु मारहाणीमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी घटनेच्या आदल्या दिवसाचा मयत सुनिलचा घटनाक्रम जाणून घेतला. सुनिलला शेवटचे कुणी पाहिले, तो कुणाकुणाला भेटला याची माहिती पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी जाणून घेतली. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी मयत सुनिलचा भाऊ संजय चव्हाण याच्याकडून माहिती घेतली असता घटनेच्या आदल्या दिवशी 25 मे रोजी सायंकाळी सुनिल यास त्याचा चुलत भाउ प्रविण जगन चव्हाण याचा फोन आला होता. प्रविण चव्हाण याने सुनिल चव्हाण यास महालखेडा येथील शेतात मांसाहारी जेवणाची पार्टी करण्यासाठी बोलावले होते. त्यासाठी सुनिल घरातून ताट, पातेले व भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन गेला होता. याबाबत त्याने त्याच्या आईला माहिती दिली होती.
त्यानंतर सुनिल घरी परत आलाच नाही व त्याचा मृतदेहच शेताजवळच्या रस्त्यावर मिळून आला. त्याचा मृत्यु झाल्याबाबत त्याच्या सोबत असलेल्या प्रविण चव्हाण व बाळु जाधव यांनी कुणालाच काही सांगितले नाही. त्यामुळे पोलिसांचा दोघांवर संशय बळावला. या घटनेप्रकरणी मयत सुनिलचा भाऊ संजय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला प्रविण चव्हाण व बाळू ममराज जाधव या दोघा संशयितांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.न. 92/2025 भारतीय न्याय संहिता 103(1), 238 (ए) 3(5) नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला. या गुन्ह्यचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील यांच्याकडे देण्यात आला.
घटनेच्या आदल्या रात्री संशयीत प्रविण चव्हाण, बाळू ममराज जाधव आणि मयत सुनिल चव्हाण यांचे मोबाईल लोकेशन पोलिस तपासात एकाच ठिकाणी आले. 25 मार्चच्या रात्री आपण महालखेडा शिवारातील शेतात प्रविण सोबत मांसाहारी पार्टी करण्यासाठी जात असल्याचे मयत सुनिल याने त्याच्या आईला सांगितले होते. त्यासाठी तो स्वयंपाकाच्या साहित्याची देखील जमवाजमव करत होता. अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोघे फरार झाले होते. या सर्व बाबी लक्षात घेत पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांचा दोघांवरील संशय बळावला.
सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील आणि पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी यांच्या अधिपत्याखाली दोन पथके तयार करण्यात आली. मिळालेल्या माहितीच्या आधारे स.पो.नि. जयेश पाटील यांच्या पथकाने प्रविण चव्हाण यास टाकळी गावातून ताब्यात घेण्यात आले. याशिवाय पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी यांच्यासह त्यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथून संशयीत आरोपी बाळू जाधव याला ताब्यात घेत अटक केली.
पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासमक्ष दोघांना हजर करण्यात आले. दोघांची प्रसंगानुरुप कधी एकत्र तर कधी वेगवेगळ्या पद्धतीने खाकीचा खाक्या दाखवत सखोल चौकशी करण्यात आली. पो.नि. नागेश मोहिते यांच्या करड्या आवाजापुढे दोघांचे खोटे बोलणे फार वेळ तग धरु शकले नाही. अखेर दोघांनी आपला कबुल केला. शेतीच्या वादातून मयत सुनिल हा आपल्या आई वडिलांना दम देत होता. त्यामुळे त्याच्या बद्दल आपल्या मनात राग होता असे प्रविण याने कबुल केले. त्यातून त्याने सुनिलला या जगातून संपवण्याचे ठरवले होते. सुनिलला दगडाने ठेचून ठार केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकामी पुढील घटनाक्रमात बाळू जाधव याने त्याला मदत केली. दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान प्रविण याने पोलिसांना दिलेल्या माहितीत बाळू जाधव याचा भाऊ पिंटू जाधव याचे नाव पुढे आले. प्रविण आणि पिंटू यांच्यात घटनेच्या रात्री घटनेविषयी वारंवार मोबाईल संभाषण झाले होते. प्रविण याने घटनेची सर्व माहिती पिंटूला वेळोवेळी दिली होती. पिंटूला घटनेची सर्व माहिती होती. तरी देखील पिंटूने संशयीतास आश्रय दिला आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली नाही. त्यामुळे पिंटू जाधव याला देखील संशयीत आरोपी करण्यात आले.
अशाप्रकारे शेतीच्या वादातून सुनिलची त्याच्याच चुलत भावाकडून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याची हत्या अपघाती मृत्यु असल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पो.नि. नागेश मोहिते आणि त्यांच्या सहका-यांनी हा गुन्हा उघडकीस आणला. हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचे उघडकीस आणण्याकामी पो.नि. नागेश मोहिते आणी त्यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, पोलिस उप निरीक्षक निलेश गोसावी, पोलिस नाईक हरिष गवळी, प्रदीप इंगळे, पो.कॉ. सागर सावे व अनिल देवरे आदींनी परिश्रम घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील करत आहेत.