जळगाव : परवाना नुतनीकरण करण्यासाठी गेलेल्या प्लंबरकडून सहाशे रुपयांची लाच मागणारे दोघे आणि लाच स्विकारणारा लिपीक अशा तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव एसीबीने केलेल्या या कारवाईत एक कंत्राटी कामगार, दुसरा पाणी पुरवठा अभियंता आणि लाच स्विकारणारा तिसरा लिपीक अशा तिघांची साखळी लाच स्विकारण्यासह मागण्यात सक्रीय असल्याचे आढळून आले आहे.
भुसावळ शहरातील प्लंबरला त्याच्या व्यवसायाचे नुतनीकरण करायचे होते. त्याकामी प्लंबर व्यावसायीक भुसावळ शहर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभगात गेला होता. त्यावेळी या प्लंबरचा संबंध कंत्राटी कामगार शाम साबळे याच्याशी आला. शाम साबळे याने सातशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सतिष देशमुख यांना फोन लावून विचारणा केली असता पलीकडून सहाशे रुपये स्विकारण्याचा निरोप आला.
त्यानंतर प्लंबर कंत्राटी कामगाराकडे सहाशे रुपयांची लाच घेऊन गेला असता कंत्राटी कामगार शाम साबळे याने लिपीक शांताराम सुरवाडे यांना कॉल केला. साहेबांनी प्लंबरकडून सहाशे रुपये घेण्यास सांगितले आहे असे लिपीकास फोनवर सांगितले. लिपीक शांताराम सुरवाडे याने सहाशे रुपयांची लाच घेताच दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. या प्रकारणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून लिपीकास ताब्यात घेण्यात आले आहे.
अंगझडती दरम्यान कंत्राटी कामगाराकडे एक मोबाईल, अभियंत्याकडे 2160 रुपये आणि वन प्लस मोबाईल व लिपीकाकडे एक हजार रुपये आणि विवो कंपनीचा मोबाईल आढळून आला. एसीबीचे पोलिस उप अधिक्षक तथा पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर यांच्या पथकातील सापळा व तपास अधिकारी श्रीमती नेत्रा जाधव व सापळा पथकातील सहायक पोलिस उप निरीक्षक सुरेश पाटील, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, महिला हे.कॉ. शैला धनगर, पोना बाळू मराठे, पो. कॉ. राकेश दुसाने, पो.कॉ प्रदिप पोळ आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.