हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

जळगाव, दि.२६ प्रतिनिधी – आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण व आत्मशोधन या स्वविकासाच्या त्रिसूत्रीद्वारे आपले चरित्र बलवान बनवा. हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा. सगळ्यांमध्ये स्वतःला आणि सगळ्यांना स्वतःत पहा, तरच आपण स्वतःला गौरवान्वित समजाल. यातूनच प्रेम व सहनशीलतेचे दर्शन होईल; हिच गांधीजींची जीवनयात्रा आहे. असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशन फॉर इकॉलॉजिकल सिक्युरिटीच्या एकता कोडे, श्रीहरी पेंडूर व ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई होते. तसेच यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेनचे डॉ. निर्मला झाला, गिरीश कुळकर्णी, सुधीर पाटील, संतोष भिंताडे आदींसह सहकारीसुद्धा उपस्थित होते. 

अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुदर्शन अय्यंगार पुढे म्हणाले कि, चरित्र निर्माण हि निरंतर चालणारी प्रक्रिया असून त्यासाठी आपण आपले जीवन दुःख आणि पश्चातापापासून मुक्त केले पाहिजे. हि जीवनभराची साधना, तपश्चर्या आपल्याला निर्मल बनवेल असेही ते म्हणाले. कार्यक्रमास मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेला सुतीहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर गायत्री कदम, नेहा पावरा, शुभम खरे, प्रेमकुमार परचाके व गुलाबभाई या विद्यार्थ्यांनी “आगे आगे बढना है तो हिंमत हारे मत बैठो…” हे गीत सादर केले. यानंतर मुकेश यादव, गुलाबभाई रामभाई व शिवम राठोड या विद्यार्थ्यांनी वर्षभराच्या अभ्यासक्रमाचा आढावा पॉवरपॉईंटच्या माध्यमातून सादर केला. अकॅडेमिक डीन डॉ. अश्विन झाला यांनी संस्थेची भूमिका व अनुभव सादर केला. विद्यार्थ्यांनी मानसिक गुलामगिरी पासून दूर राहावे असे आवाहन करीत आगामी काळात आपल्याला मिळालेला शैक्षणिक अनुभव स्वतंत्र निर्णय घेण्यासाठी साहाय्यभूत ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

यानंतर गुलाबभाई रामभाई, गायत्री कदम, यश मानेकर, नेहा पावरा, शुभम खरे, सुशीला बेठेकर व मुकेशकुमार यादव या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या एकता कोडे यांनी दररोज नवीन काही तरी शिकून जीवनाचा आनंद घेत राहा. पदविका अभ्यासक्रमातून निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेद्वारे जीवनाला उच्च पातळीवर न्या असे आवाहन केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदविका प्रदान करण्यात आली. ऐश्वर्या तांबे, प्राजक्ता ढगे, फिरदोस बेगम, उमेश गुरनुले, अक्षय मानकर यासह १३ विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात आली.  दीपक मिश्रा यांनी सूत्रसंचलन करत आभारसुद्धा मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here