विम्याच्या रकमेसाठी शालकाची हत्या – अपघाती मृत्यूचा बनाव उघडकीस

On: April 29, 2025 10:17 AM

जळगाव : विम्याच्या रकमेसाठी अपंग आणि व्यसनी शालकाची हत्या करणा-या कपाशी व्यापा-यास पारोळा पोलिसांनी अटक केली आहे. शालकाच्या अपंगत्वाचा आणि व्यसनाधिनतेचा गैरफायदा घेत त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव आणि खून देखील पारोळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. 53 लाख रुपयांच्या विमा रकमेवर डोळा ठेऊन ती रक्कम लाटण्याचा डाव पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या चाणाक्ष नजरेसह तपासातून उघडकीस आला.

पारोळा तालुक्यातील शेवगे येथील रहिवासी संदीप भालचंद्र पाटील हा कपाशीचा व्यापारी आहे. त्याचा धुळे जिल्ह्यातील फागणे येथील शालक समाधान शिवाजी पाटील हा अपंग आणि व्यसनी होता. याच्या अपंगत्वाचा आणि व्यसनी असल्याचा फायदा घेण्याचे संदीप पाटील याने निश्चीत केले होते. त्याने शालक समाधान शिवाजी पाटील याच्या नावे एलआयसीच्या तीन आणि अन्य खासगी कंपन्यांच्या दोन अशा एकुण 53 लाख रुपयांच्या पाच विमा पॉलीसी काढल्या होत्या. या रकमेवर नजर ठेऊन ती रक्कम लाटण्यासाठी त्याने त्याचा अपघाती मृत्यू घडवण्याचा कट रचला.  

समाधान पाटील वापरत असलेल्या स्कुटीचा संदिप पाटील याने  पुर्ण विमा काढून त्याला स्कुटीसह गावी पाठवले होते. 17 एप्रिल  2025 रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास महामार्गावर त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचा निरोप संदिपने पारोळा पोलिसांना निरोप दिला. माहिती मिळाल्यानंतर पारोळा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळावर मरण पावलेल्या समाधान पाटील याच्या डोक्यातून येणारे रक्त काही अंतरावर पडलेले होते. घटनास्थळावरील मयत समाधानची स्कुटी सुस्थितीत होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मनात संशयाने जागा घेतली. मोबाईल सीडीआर, मोबाईल लोकेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आदींची बारकाईने तपासणी केली असता वेगळेच सत्य बाहेर आले. पो.नि. सुनिल पवार यांनी संशयीत संदीप पाटील याच्यासह त्याच्या एका साथीदारास चौकशीकामी ताब्यात घेतले.

संदिप पाटील व त्याचा साथीदार अशा दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. संदीप पाटील याचा शालक समाधान शिवाजी पाटील हा अपंग आणी व्यसनी होता. त्याचा गैरफायदा घेत संदीपने काही महिन्यापूर्वी त्याचा नावे विविध विमा पॉलिसी काढून संदिपच्या पत्नीला वारस लावले होते. 17 एप्रिल रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास संदीप व त्याचा आते भाऊ चंद्रदीप आधार पाटील (रा. खवशी ता. अमळनेर) या दोघांनी समाधान याला स्कूटीवर बसवून धुळे ते जळगाव रस्त्यावर नेले. अंधाराचा फायदा घेत निष्पाप समाधानच्या डोक्यावर लोखंडी रॉडने जोरदार हल्ला करुन त्याला ठार करण्यात आले. त्याला ठार करुन त्याचा अपघाती मृत्यु झाल्याचा बनाव करण्यात आला.

स्कुटी सुस्थितीत मात्र वाहनधारक समाधानच्या डोक्यातून सुरु असलेला रक्तस्त्राव बघून पोलिसांच्या मनात संशयाने जागा घेतली आणि पुढील तपास सुरु झाला. अवघ्या दहा दिवसात हा अपघाती मृत्यूचा बनाव आणि हत्येचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांच्या ताब्यातील संदीप पाटील हा चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्यासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment