घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी बस स्थानकावर सामाजिक बांधिलकीतून पाणपोई सुरु करण्यात आली आहे. पांढरकवडा बस आगार प्रमुख आशिष काकडे यांच्या हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. या पाणपोईमुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे.
कडक उन्हाळ्यात प्रवाशांसाठी बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची ओरड सुरु होती. त्याबाबत प्रसार माध्यमातून आवाज देखील उठवण्यात आला होता. प्रशासनाने या बाबत दखल घेतली नसतांना घाटंजीकरांनी पुढाकार घेत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवून आणले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने स्व. दादासाहेब कोमावार व स्व. प्रभाबाई अक्कलवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या पाणपोईचे उद्घाटन पांढरकवडा आगार प्रमुख आशिष काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी या पाणपोईसाठी आवश्यक असलेली जागा देखील उपलब्ध करुन दिली.
या उद्घाटन प्रसंगी पांढरकवडा आगार प्रमुख आशिष काकडे, वाहतूक नियंत्रक शैलेश पाली, वाहतूक नियंत्रक विष्णू किनाके, भिमराव ताकसांडे, राजू मंगाम, अनंत कटकोजवार, सुभाष देवळे, अनिल कोमावार, मंगला कटकोजवार, दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार संतोष अक्कलवार, दैनिक लोकदुतचे पत्रकार संतोष पोटपिल्लेवार, किशोर अक्कलवार, एस. टी. माल वाहक विजय मोहिजे, कविता मोहिजे यांच्यासह प्रवासी बांधव उपस्थित होते.