जळगाव : विश्वास संपादन करत खोटी हकीकत सांगून साठ वर्ष वयाच्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करणा-या पिता पुत्रापैकी पित्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. गुलजार बजरंगी असे अटक करण्यात आलेल्या भामट्याचे नाव आहे.
दि.15 एप्रिल 2025 रोजी कस्तुराबाई लक्ष्मण पाटील या पाचोरा तालुक्यातील रहिवासी वृद्ध आजीबाई जळगाव शहरातील भजे गल्लीतून त्यांच्या मुलाच्या घरी पायी जात होत्या. त्यावेळी त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी खोटे बोलून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत गुलजार बजरंगी व त्यांच्या मुलाने लंपास केली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.
या गुन्ह्यात पिता पुत्राचा समावेश असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे जाखनी नगर भागातील चोखामेळा होस्टेलच्या मागे राहणा-या गुलजार लाठीया बजरंगी (वय 77) यास ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्यात आपल्यासोबत आपल्या मुलाचा देखील सहभाग असल्याचे कबुल केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, अक्रम शेख, हरिलाल पाटील, विजय पाटील, प्रवीण भालेराव, किशोर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्यातील दुस-याचा शोध सुरु आहे. अटकेतील गुलजार बजरंगी यास जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.