खून, घात की हार्ट अटॅक? नेमका कसला खेळ? — नर्स पतीच्या मृत्यु तपासाचा बसेल का मेळ?

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): पहुर पोलिस स्टेशन हद्दीतील परिचारिका महिलेच्या पतीचा मृत्यु हा नेमका खून, घातपात की हार्ट अटॅक आहे याबाबत परिसरात विविध प्रकारच्या चर्चा सुरु आहेत. संशयीत आरोपींना तडजोड करण्यासाठी विविध प्रकारे विलंब केला जात असल्याची देखील चर्चा या निमीत्ताने सुरु झाली आहे. 2 जून रोजी शेंदुर्णी येथे इसमाचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी पहुर पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. आज या घटनेला चार दिवस झाले असून अद्याप या घटनेप्रकरणी वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला नाही. याशिवाय विविध अ‍ॅंगलने या घटनेकडे पाहिले जात असून परिसरातील जनतेच्या मनात शंकेला वाव निर्माण झाला आहे. मयताच्या अंगावरील मारहाणीच्या जखमा बघता त्याचा खात्रीलायकरित्या खून झाला असल्याचे त्याच्या पत्नीचे म्हणणे आहे. महिलेने तसे निवेदन पहुर पोलिस निरीक्षकांना दिले आहे.

शेंदुर्णी येथील रहिवासी असलेली एक परिचारिका तिच्या आई वडीलांच्या भेटीसाठी माहेरी बुलढाणा येथे 31 मे 2025 रोजी गेली होती. त्यावेळी शेंदुर्णी येथे घरी तिचा पती एकटाच होता.  त्यानंतर या परिचारिकेने 1 जून रोजी पतीला फोन केला असता तो लागला नाही. त्यानंतर ती परिचारिका 2 जून रोजी घरी परत आली. त्यावेळी तिला घरात तिच्या पतीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावरील जखमा बघता हा खून असल्याची तिची खात्री झाली. अज्ञात मारेक-यांनी आपल्या पतीला मारहाण करुन त्याचा खून केला असल्याचा तिचा आरोप आहे. तसेच त्याचा मोबाईल फोन देखील अज्ञात मारेक-यांनी फोडला असल्याचे तिचे म्हणणे आहे. या घटनेप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद झाली असून वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. असे असले तरी खूनाचा गुन्हा दाखल होण्यासह या गुन्ह्याचा वरिष्ठ अधिका-यांकडे तपास आणि चौकशी समिती नेमण्यात यावी अशा विविध मागण्या महिलेने पोलिस निरिक्षकांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत. 

या घटनेला अपघाताचे वळण देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु असल्याचा आरोप देखील या घटनेच्या निमीत्ताने केला जात आहे. त्याचे कारण म्हणजे सुरुवातीला हा मृत्यु हार्ट अटॅकने झाला असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. सुत्रांनी दिलेली माहिती आणि चर्चेतून समजलेल्या माहितीच्या आधारे मयतासह दोघांनी मयताच्याच घरात मद्यपानाची पार्टी केली होती असे म्हटले जाते.

त्यानंतर त्या दोघांनी मयताला ट्रॅक्टरवर बसवून बाहेर नेले. मयत धावत्या ट्र्क्टरवरुन खाली पडला असे म्हटले जात आहे. जर मयत धावत्या ट्रॅक्टर वरुन खाली पडला तर त्याच्या अंगावर कुठेही जखमा दिसून आल्या नसल्याचे म्हटले जात आहे. जर मयत धावत्या ट्रॅक्टरवरुन खाली पडला तर त्याला दवाखान्यात न नेता त्याच्या राहत्या घरी का आणून टाकले असा देखील या निमीत्ताने प्रश्न उपस्थित केला जात असून चर्चा होत आहे. एकंदरीत पहुर आणि शेंदुर्णी परिसरात हा चर्चेचा विषय झाला असून याप्रकरणी सखोल चौकशी आणि तपासाची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here