नाशिक (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): गुन्हेगारांविरुद्ध कारवाई आणि सज्जनांचे रक्षण यापलीकडे देखील एखादे जग असते आणि ते म्हणजे माणुसकीचे जग. हे माणूसकीचे जग काही पोलिस अधिकारी आपल्या सत्कर्माच्या माध्यमातून जगाला प्रसंगानुरुप दाखवून देतात. त्यापैकीच एक आहेत पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी. सध्या नाशिक ग्रामीणच्या पिंपळगांव बसवंत पोलिस स्टेशनला नियुक्तीस असलेले दुर्गेश तिवारी यांनी एका निराधार माऊलीसह तिच्या दोघा लेकरांना खाकीच्या मायेची ऊब देत त्यांच्या अंधकारमय जीवनात आश्रयाचा आधार मिळवून दिला. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पिंपळगाव बसवंत येथील मंदीर परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक निराधार महिला तिच्या दोन्ही अजाण मुलींसह वावरत होती. हा प्रकार स्थानिक सामाजिक कार्यकर्ता दत्तू झनकर व त्यांच्या काही मित्रांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच तिघांना पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी त्या निराधार महिलेची व्यथा ऐकून घेतली. पनवेल येथील त्या महिलेचा पती आणि माहेरची एक व्यक्ती तिला मानसिक व शारिरीक त्रास देत होते. पतीने त्या महिलेला तिच्या दोन्ही मुलींसह घरातून बाहेर काढून टाकले होते. आता पुन्हा पतीकडे अथवा माहेरी परत जायचे नाही या विचाराने ती बेघर महिला घराबाहेर पडली.
गेल्या दोन महिन्यांपासून ती बेघर महिला आपल्या दोन्ही मुलींसह नाशिक जिल्ह्यात दरदर ठोकर खात भटकत होती. सासरी अथवा माहेरी जायचे नाही हा एकच ठाम निर्णय घेत ती भटकंती करत होती. मिळेल ते अन्न खावून ती दिवस काढत होती. सोबत असलेल्या दोन्ही मुलींच्या भविष्याची चिंता तिला सतावत होती. तशातच सामाजिक कार्यकर्ता दत्तू झनकर यांनी तिला पोलिस स्टेशनला आणून सोडले.
महिलेची व्यथा ऐकून घेत पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी तिच्या दोन्ही मुलींना तुम्ही शाळेत जाल का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी दोघी मुलींनी मोठ्या उत्साहाने होकार दिला. एकीने डॉक्टर तर दुसरीने मला पोलिस व्हायचे आहे असे पो.नि. दुर्गेश तिवारी यांना सांगितले. त्यावर तिवारी यांनी काही वेळ मनाशी विचार करत येवला येथील सैंगऋषी वृद्ध व अनाथ आश्रमाच्या संस्थापकांसोबत संपर्क साधला. त्यांना या महिलेसह तिच्या दोघी मुलींची माहिती देत पो.नि. तिवारी यांनी सहकार्य करण्याची विनंती केली.
पो.नि. दुर्गेश तिवारी यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आश्रमाचे संस्थापक नवनाथ जऱ्हाड हे स्वतः पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनला हजर झाले. रितसर सर्व सोपास्कार पार पाडल्यानंतर त्या माऊलीसह तिच्या दोघा लेकरांना ज-हाड यांच्या स्वाधीन करण्यात आले. अशा प्रकारे निराधार मायलेकींना एक आश्रयस्थान मिळाले. याकामी पो.नि. दुर्गेश तिवारी यांच्यासह सैंगऋषी वृद्ध अनाथ आश्रमाचे नवनाथ जऱ्हाड, गोकूळ खैरनार, विकास वाळुंज, शुभम उगले, सामाजिक कार्यकर्ता दत्तू झनकर, महिला पोलीस हवालदार उर्मिला काठे, सविता धामणे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले. पती पत्नीच्या वादात आपल्या मुलांचे भविष्य खराब होणार नाही याची काळजी प्रत्येक पालकांनी घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी पो.नि. दुर्गेश तिवारी यांनी व्यक्त केले.







