नाशिक : चारधाम यात्रेला जाण्यासाठी यात्रेकरुंकडून प्रवासाचे 4 लाख 26 हजार 950 रुपये जमा करुन त्यांना यात्रेला न नेता त्यांची फसवणूक झाल्याच्या आरोपाखाली नाशिकच्या शौर्य यात्रा कंपनीचा मालक मयूरेश वाघ याच्याविरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश किसन भोर यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.
निलेश भोर यांनी म्हटल्यानुसार त्यांनी शौर्य यात्रा कंपनीची व्हाटस अॅपवर जाहिरात पाहिली होती. त्यानुसार निलेश भोर यांच्यासह त्यांच्या इतर मित्रांनी परिवारासह चारधाम यात्रेला जाण्याचे निश्चित केले. त्यानुसार सर्वजण नाशिक येथे शौर्य यात्रा कंपनीच्या कार्यालयात 21 जानेवारी 2025 रोजी गेले होते. सुमारे सोळा जणांनी मिळून सुरुवातीला निलेश वाघ याच्या फोन पे खात्यावर 2 लाख 22 हजार 300 रुपये जमा केले. त्यानंतर नीलेश वाघ यांच्या म्हणण्यानुसार 1 मे 2025 ही प्रवासाची तारीख निश्चित करण्यात आली.
त्यानंतर मेंबरशिप घ्यावी लागेल अन्यथा यात्रा रद्द होईल असे सांगून प्रती व्यक्ती पाचशे रुपये निलेश वाघ याने त्यांच्या खात्यावर सर्वांकडून जमा केले. त्यानंतर विविध कारणे सांगून यात्रेची तारीख पुढे ढकलली. त्यांतर मेंटेनंस चार्जेसच्या नावाखाली पुन्हा सर्वांना प्रत्येकी 750 जमा करण्यास भाग पाडले. 750 रुपये जमा केले नाही तर यात्रा रद्द होईल अशी भीती घालण्यात आल्याने पुन्हा सर्वांनी ती रक्कम जमा केली. अशा प्रकारे नंतर उडवाउडवीची उत्तरे देत निलेश वाघ याने वेळ मारुन नेली.
अखेर फसवणूक झालेले सर्वजण शौर्य यात्रा कंपनीच्या कार्यालयात गेले असता त्यांना ते कार्यालय बंद आढळले. आलेल्या सर्वांनी आजूबाजूला चौकशी केली असता यात्रा कंपनीचे कार्यालय गेल्या काही महिन्यापासून बंद असल्याचे समजले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर सर्वांच्या वतीने निलेश भोर यांनी पंचवटी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. पंचवटी पोलिस पुढील तपास करत आहेत.