जळगाव – घरातील आणि सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात हरल्याने जुगाराची सवय जडलेल्या महिलेने केलेला घरफोडीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिस स्टेशनला संबंधित महिलेच्या मुलाने दिलेल्या माहितीच्या आधारे घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. भुसावळ शहरातील लिम्पस क्लब नॉर्थ कॉलनी भागात हा बनावट घरफोडीचा प्रकार उघडकीस आला आहे.
दिनांक 11 जून रोजी या गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. निरीक्षणाअंती घटनास्थळाच्या बाजूस असलेले घर गेल्या दहा दिवसापासून बंद होते. मात्र घरात चोरी झाल्याचे पोलिस पथकाला दिसून आले नाही. या गुन्हयातील फिर्यादीच्या घराचे कुलूप तुटले नसल्याचे देखील निदर्शनास आले. त्यामुळे एकुण संशयास्पद स्थितीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिर्यादीच्या घरातील सदस्यांची सखोल विचारपूस केली असता खरा प्रकार उघडकीस आला.
फिर्यादीची आई शर्मिला चंद्रमणी शिंदे या महिलेस जुगार खेळण्याचा नाद लागला होता. घरातील रोख रकमेसह सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात शर्मिला शिंदे ही महिला हरली होती. हरलेली रक्कम पुन्हा जुगार खेळून जिंकण्याच्या अमिषाने तीने कोणास काहीएक न सांगता घरातील स्वतःचे व तीच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने बँकेत तारण ठेवले. त्यावर गोल्ड लोन घेवून आलेले पैसे जुगारात, आईच्या आजारपणात तसेच घर खर्चात झाल्याचे शर्मिला शिंदे या महिलेने पोलिसांना सांगितले. त्यातील काही रोख रक्कम जुगार खेळण्यासाठी वापल्याचे सांगितले आहे.
शर्मिला चंद्रमनी शिंदे या महिलेने बँकेत तारण ठेवलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्याच्या पावत्या बँकेकडून प्राप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार रवी नरवाडे, पो.हे. कॉ. गोपाल गव्हाळे, पो.हे. कॉ. संदिप चव्हाण व चा.पो.कॉ. महेश सोमवंशी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.