जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : गोवंश चोरीसह दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या कारमधील टोळीचा पाठलाग करत चालकास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. मात्र दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाले. 15 जूनच्या रात्री अकरा वाजता मुक्ताईनगर पासून सुरु झालेला दरोडेखोरांचा पाठलाग 16 जूनच्या पहाटे पाच वाजता अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात संपला. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी हा पाठलाग केला. त्यात पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना जीवे ठार करण्याच्या इराद्याने त्यांच्या अंगावर गाडी टाकण्याच्या प्रयत्न दरोडेखोरांच्या टोळीतील चालकाने केला. त्यात त्यांना मुकामार लागला. अरबाज खान फिरोज खान (रा. खदान, हैदरपुरा, आलीम चौक, अकोला) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील व त्यांचे सहकारी श्रेणी पीएसआय अनिल जाधव, वाहन चालक ही. कॉ. दर्शन ढाकणे असे 15 जूनच्या रात्री जिल्हा गस्तीसाठी मुक्ताईनगरच्या दिशेने रवाना झाले होते. मुक्ताईनगर उप विभागात गस्ती दरम्यान डोलारखेडा रस्त्याने गस्त सुरु असतांना कुंड गावात पोलिस पथकाला एक संशयास्पद इनोव्हा कार दिसली. त्या कारामधून चार जण उतरुन एका घरात जातांना पथकाला दिसले.


पोलिसांचे वाहन दिसताच कारमधून उतरलेले चौघे जण पुन्हा कारामधे येऊन बसले. कारमधे बसल्यानंतर कार भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने जाऊ लागली. हा संशयास्पद प्रकार बघून पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी या कारचा पाठलाग करण्यास चालक हे कॉ दर्शन ढाकणे यांना सांगितले. वारंवार इशारा करुन देखील संशयास्पद कार थांबत नव्हती. या संशयास्पद इनोव्हा कारचा ओव्हर टेक करत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र इनोव्हा कार चालकाने शासकीय वाहनास कट मारुन ते खाली पाडण्याचा प्रयत्न केला.
अखेर पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी मलकापुर, नांदूरा, बुलढाणा, अकोला इत्यादी ठिकाणी पोलिस कंट्रोल रुमला संपर्क करुन हे वाहन अडवण्याबाबत कळवले. अखेर अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात ट्रक आडवे लावून हे वाहन अडवण्यात आले. तब्बल पाच ते सहा तास पाठलाग केल्यानंतर इनोव्हा कारमधील दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चौघे पळून जावू लागले. अकोला जूने शहर पोलिस स्टेशनचे पीएसआय रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे, पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
इनोव्हा कार चालक अरबाज खान याने त्याच्या ताब्यातील कार एलसीबी पोलिस निरिक्षक संदीप पाटील यांच्या अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना मुकामार लागला. कार चालक अरबाज खान फिरोज खान यास कारसह ताब्यात घेत अटक करण्यात आली. त्या कारची तपासणी केली असता त्यात पोलिसांना एक काळया रंगाचा चोरी केलेला बैल मिळून आला. याशिवाय एक तलवार, नऊ गुप्ती, एक चाकु, एक लोखंडी रॉड, दोन दोर, कपडे आदी मुद्देमाल मिळून आला. अकोला जुने शहर पोलिस स्टेशनला पंचनामा करुन हा मुद्देमाल जप्त करण्यात आला
अटकेतील चालक अरबान खान फिरोन खान (अकोला) याच्यासह सैय्यद फिरोज ऊर्फ अनडूल सैय्यद जहीर (रा. अंजुमपुरा, कसारखेडा ता. बाळापुर जि. अकोला), अफजल सैय्यद (रा. काली घाणीपुरा बाळापूर जि. अकोला), इमरान (रा.बिकुंड नदी कासारखेडा बाळापूर – अकोला), तन्नु ऊर्फ तन्वीर (रा. काली घाणी बाळापूर – अकोला), अफरोज खान ऊर्फ अप्या असे दरोडेखोर आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. संदीप पाटील यांच्यासह फौजदार शरद बागल, श्रेणी फौजदार अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे, सफौ रवि नरवाडे, पोहेकॉ सुनिल दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोहेकॉ भरत पाटील व जुने शहर पो.स्टे. अकोला येथील फौजदार रविंद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे, पोकॉ स्वप्नील पोधाडे यांनी या कामगिरीत सहभाग घेतला.