जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): “जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना” असे एक वाक्य अमिताभ बच्चन अभिनीत “अंधा कानून” या चित्रपटातील एका गीतात आहे. ज्याचे जितके आयुष्य विधी लिखीत आहे तो तितकेच आयुष्य या धरतीवर घालवतो. अर्थात या म्हणण्याला कायदेशीर आणि वैज्ञानिक आधार नसला तरी श्रद्धेचा आधार नक्की आहे. कित्येक जण या श्रद्धेच्या आधारावर विश्वास ठेवतात. “मनुष्य हा नियतीच्या हातातील बाहुले आहे” हेच “जितनी चाबी भरी रामने ..” या गीतातून दर्शवण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव खर्ची या गावी एका चौदा वर्षांच्या बालकाच्या गळ्यावर चाकूचे वार करुन त्याची हत्या करण्यात आली. नरबळीचा हा प्रकार असल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात आला. मात्र केवळ धक्का लागण्याच्या किरकोळ वादातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले.

एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव या गावातील रहिवासी गजानन नामदेव महाजन या शेतकरी बांधवास तेजस नावाचा अवघा चौदा वर्षांचा मुलगा होता. रिंगणगाव येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. सोमवार 16 जूनच्या सायंकाळी बाजाराच्या दिवशी तेजस हा मोबाईलच्या एका दुकानात त्याचा मोबाईल चार्ज करण्यासाठी गेला. मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तेजस हा बाजारात बिर्याणी खाण्यासाठी गेला. वाटेत पलीकडून हरदास वास्कले, सुरेश खरते आणि रिचडिया कटोले हे तिघे मजूर येत होते. बाजाराचा दिवस असल्यामुळे तिघांनी कमी अधिक प्रमाणात मद्यपान केले होते. त्यामुळे त्यांची चालण्याची गती अडखळणा-या पायांमुळे मंदावली होती.

पलीकडून येणा-या चौदा वर्षाच्या तेजसला हरदास वास्कले या मजुराचा धक्का लागला. आपल्याला धक्का लागल्याचे बघून तेजसने त्याला जाब विचारला. आपल्याला जाब विचारल्याचे बघून हरदास वास्कले याचा कमी अधिक प्रमाणात इगो दुखावला. त्यामुळे त्याने देखील तेजसला सुनावले. नजर चुकीने लागलेल्या धक्क्याचे रुपांतर आई बहिणीवरुन शिवीगाळ करण्यात झाले. बघता बघता तेजस आणि हरदास वास्कले यांच्यातील शाब्दिक वाद वाढत गेला.
चौदा वर्षाचा बालक तेजस हा आपल्या साथीदाराला शिवीगाळ करत असल्याचे बघून हरदास वास्कले याच्यासोबत असलेल्या सुरेश खरते आणि रिचडीया कटोले या दोघांनी तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली. आपले साथीदार तेजसला मारहाण करत असल्याचे बघून हरदास वास्कले याने देखील तेजसला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मद्याच्या नशेतील धडधाकट तिघा मजुरांपुढे चौदा वर्षाच्या तेजसचा प्रतिकार तोकडा पडत होता. तरीदेखील तो तिघांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न आणि शिवीगाळ करत होता. संतापाच्या भरात रिचडीया कटोले याने त्याच्याजवळ असलेला चाकू बाहेर काढला. मद्याच्या धुंदीत आणि संतापाच्या भरात रिचडीया कटोले याने तेजसच्या गळ्यावर चाकूचे वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. चाकूच्या घावात तेजसने आपले प्राण सोडले. निर्जन स्थळी झालेला हा खूनाचा प्रकार कुणी पाहीला नाही याची तिघांनी खात्री केली. त्यानंतर सर्वांनी मिळून तेजसचा मृतदेह उचलून तो सुरेशच्या खांद्यावर ठेवला.




लपून छपून आडमार्गाने तिघे रहात असलेल्या झोपड्यांच्या बाजूला काटेरी झाडाझुडूपात तिघांनी मिळून तेजसचा मृतदेह ठेवून दिला. आपल्याला कुणीही पाहिले नाही याची पुन्हा एकवेळा तिघांनी खात्री करुन घेत या घटनेबाबत कमालीची गुप्तता पाळली. दरम्यान घराबाहेर गेलेला आपला मुलगा तेजस अंधार पडला तरी देखील घरी आला नाही म्हणून त्याचे पालक हैरान झाले. त्याच्या पालकांसह परिसरातील रहिवाशांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र कुठेही तेजसचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर तेजसचे वडील गजानन महाजन यांनी एरंडोल पोलिस स्टेशनला धाव घेत पोलिस निरिक्षक निलेश गायकवाड यांच्याकडे आपली व्यथा कथन केली. गजानन महाजन यांच्या तक्रारीनुसार एरंडोल पोलीस स्टेशनला गु.र.न.97/2025 भारतीय न्याय संहिता कलम 137 (2) अन्वये बालकाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेत एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी आपल्या सहका-यांसह गावक-यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. दुस-या दिवशी 17 जूनच्या सकाळी गावालगत रिंगणगाव खर्चे रस्त्यालगतच्या शेतात तेजसचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह गावक-यांना आढळून आला. त्याच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे घाव दिसून आले. धारदार शस्त्राने हत्या झालेल्या तेजसचा मृतदेह बघून त्याचे वडील गजानन नामदेव महाजन हे धाय मोकलून रडू लागले. त्यांचा गगनभेदी आक्रोश बघून उपस्थितांचे मन हेलावले.

या घटनेची माहिती एरंडोल पोलिस स्टेशनला समजताच पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. तेजसच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्याला जखमी केल्याचे पो.नि. निलेश गायकवाड यांना दिसून आले. या जीवघेण्या हल्ल्यात तेजसचा मृत्यु झाला होता. या घटनेच्या पार्श्वभुमीवर गावक-यांमधे भितीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले. लागलीच गावक-यांनी एकजुट करत महामार्गावर येऊन रास्ता रोको आणि निदर्शने करण्यास सुरुवात केली. हा खूनाचा प्रकार नरबळीतून झाल्याचा संदेश समजात पसरला. या गुन्ह्याचा तातडीने तपास करुन मारेक-यांना अटक करा या बाबतचे निवेदन पोलिस स्टेशनला देण्यात आले. या सर्व घडामोडी बघता शोकाकुल नातेवाईकांची समजूत घालून लवकरच मारेकरी गजाआड दिसतील असे आश्वासन त्यांना देण्यात आले.

या संवेदनशील गुन्हात मारेक-यांनी तेजसचा खून करतांना कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. त्यामुळे पोलीसांसमोर आरोपी शोधण्याचे मोठे आवाहन होते. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेत देत, पाहणी करुन प्रभारी अधिकारी निलेश गायकवाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींचा शोध घेण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. त्या मार्गदर्शनाखाली तेजस हा घटनेच्या दिवशी सायंकाळी कुणाकुणाच्या संपर्कात आला? तो कुठे कुठे गेला होता? याबाबत माहिती संकलीत करण्यास आली. मात्र त्यातून ठोस माहिती निष्पन्न झाली नाही.
तेजसचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला होता त्या शेतात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचा-यांनी पुन्हा भेट देत बारकाईने पाहणी केली. तेजसचा मृतदेह ज्या शेतात मिळुन आला त्या ठिकाणा पासुन सुमारे पन्नास फुट अंतरावर राहणारे व मध्यप्रदेशातील खरगोण परिसरातून शेतीकामासाठी आलेले काही मजूर परिवारासह रहात होते. त्या परिवारातील हरदास वास्कले हा त्याच्या परिवारासह मोटार सायकलने परगावी गेला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. तसेच हरदास वास्कले याच्या शेजारी राहणारा सुरेश खरते हा देखील सकाळीच त्याच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी मोटारसायकलने गेला असल्याची माहिती त्यांना समजली.
सध्या पावसाळा सुरु असून शेतात पेरणीचे दिवस आहेत. अशा परिस्थितीत दोघे मजुर शेतमालकाला न सांगता परस्पर परगावी कसे काय निघून गेले हा प्रश्न त्यांना पडला. त्यामुळे संशयाची सुई हरदास वास्कले आणि सुरेश खरते या दोघांवर स्थिरावली. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी तिन शोध पथकांची निर्मीती केली. त्या पथकाला सुचना देऊन रवाना करण्यात आले.
पोलिस कर्मचारी गौरव पाटील यांनी तांत्रीक तपासातून संशयीत हरदास वास्कले याचे लोकेशन मिळवले. तो फैजपुर – रावेर मार्गे मध्य प्रदेशात जात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सिमावर्ती भागात नाकाबंदी लावण्याचे आदेश पोलिस अधिक्षक डॉ. रेड्डी यांनी फैजपूर आणि रावेर पोलिसांना दिले. फैजपूर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या नाकाबंदीत संशयीत हरदास वास्कले हा त्याच्या ताब्यातील मोटार सायकलसह सापडला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पोलिस नाईक श्रीकृष्ण देशमुख, सहायक फौजदार रवी नरवाडे, हवालदार संदिप चव्हाण, गोपाळ गव्हाळे, यशवंत टहाकळे, पोलिस कर्मचारी बबन पाटील, प्रदीप सपकाळे, प्रियंका कोळी, चालक महेश सोमवंशी आदींनी त्याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यात आपला सहभाग असल्याची कबुली दिली.
हरदास वास्कले याच्या घराशेजारी राहणारा सुरेश खरते, व गावात राहणारा रिचडीया कटोले असे तिघे जण घटनेच्या सायंकाळी येत होते. त्यावेळी हरदास वास्कले याचा तेजसला धक्का लागला. त्यातून शिवीगाळ आणि मारहाण व नंतर खूनाचा प्रकार घडला. तेजस तिघांना विरोध करत असतांना तिघांनी त्याला मारहाण केली. दरम्यान रिचडीया कटोले याने तेजसच्या गळ्यावर चाकूचे घाव घालून त्याला जीवानिशी ठार केले. तिघांनी मिळून तेजसचा मृतदेह झोपड्यांच्या बाजूला काटेरी झुडूपात लपवून देत पलायन केले. या घटनेची तिघांनी कमालीची गुप्तता पाळली होती.
हरदास वास्कले याला ताब्यात घेतल्यानंतर पुढील टप्प्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक शरद बागल, अकरम याकुब, हरिलाल पाटील, विजय पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, विष्णु बि-हाडे, संदीप पाटील प्रविण मांडुळे, राहुल कोळी, किशोर पाटील, पोलिस कर्मचारी प्रदीप चवरे, विलेश सोनवणे, हवालदार सुनिल दामोदरे, रविंद्र पाटील आदींच्या पथकाने सुरेश खरते याला मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्याच्या डोंगराळ वस्तीतून ताब्यात घेण्यत आले. त्याने देखील आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात रिचडीया कटोले याने चाकूहल्ला करुन तेजसला ठार केल्याची दोघांनी कबुली दिली. त्याच्या शोधार्थ सहायक पोलिस निरीक्षक शेखर डोमाळे यांचे पथ रवाना करण्यात आले. अटकेतील दोघांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. या गुन्ह्याचा पुढील तपास एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांचे सहकारी करत आहेत.