पारवेकर विविध सहकारी संस्थेला ‘उत्कृष्ट सहकारी संस्था’ राष्ट्रीय पुरस्कार!

On: June 22, 2025 10:30 AM

घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : शुक्रवार दि. 20 जून 2025 रोजी मुंबई येथे नाफेडच्या सौजन्याने संपन्न झालेल्या ‘राष्ट्रीय सहकार महोत्सव 2025’ या भव्य कार्यक्रमात देशभरातील नामवंत सहकारी संस्था आणि मान्यवरांची उपस्थिती लाभली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध संस्थांना या वेळी गौरविण्यात आले. 

या सोहळ्यात श्रद्धेय आबासाहेब देशमुख पारवेकर विविध सहकारी संस्था, पारवा (ता. घाटंजी, जि. यवतमाळ) हिला ‘उत्कृष्ट सहकारी संस्था’ म्हणून राष्ट्रीय पातळीवरील विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळण्यात यवतमाळचे माजी आमदार अण्णासाहेब देशमुख पारवेकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा असून त्यांच्याच प्रेरणेने ही संस्था यशस्वी वाटचाल करीत आहे, हे येथे उल्लेखनीय.

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर व सामान्य सदस्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पीक कर्ज, बियाणे, खते, शेती साहित्यांचे वेळेवर वितरण, आर्थिक सल्ला व पारदर्शक कारभार हे संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य ठरले आहे. पुरस्कार वितरण प्रसंगी पारवा येथील श्रदे्धय आबासाहेब देशमुख पारवेकर विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन देशमुख पारवेकर आणि सचिव सुरेश ईसपाडे यांनी यावेळी उपस्थित राहून हा सन्मान संस्थेच्या सर्व सदस्य, कर्मचाऱ्यांचे संयुक्त योगदान व विश्वास यांना अर्पण केला.

हा पुरस्कार केवळ संस्थेचाच नव्हे, तर घाटंजी तालुक्यातील सहकार क्षेत्राचा सन्मान असून, यामुळे यवतमाळ जिल्ह्याच्या सहकार चळवळीला नवे बळ मिळाले आहे. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेली ही संस्था आज ग्रामीण सहकार व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण ठरत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment