नाशिक रोड (प्रतिनिधी) – विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृति आराखडा संदर्भात सहविचार बैठक मंगळवार दिनांक २४ जून २०२५ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता अमळनेर जिल्हा जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. लाड सुवर्णकार समाजाचे कै. कलाबाई रामचंद्रशेट चित्ते सभागृह, मिल चाळ, श्रीराम चौक, स्टेशनरोड, अमळनेर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सकल भारतीय सोनार समाज संघटन, सर्व शाखीय सोनार समाजाचे अभेद्य संघटन व्हावे, यासाठी सातत्याने समाजप्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठा ने जाहीर केलेल्या कृती आराखड्यानुसार, पुढील नऊ विविध समित्यांचे गठण करण्यात येत आहे.१. प्रथम विवाह वधु वर परिचय संकलन समिती २. पुनर्विवाह वधु वर परिचय संकलन समिती ३. दिव्यांग वधु वर परिचय संकलन समिती ४. परिचय पत्र पडताळणी समिती ५. अनुरूप परिचय पत्र निवड समिती ६. विवाहपूर्व समुपदेशन समिती ७. विवाहोत्तर समुपदेशन समिती ८. वधु वर मेळावा आयोजन समिती ९. सामुदायिक विवाह सोहळा आयोजन समिती.
आरंभिक टप्प्यात समिती क्र १ ते ५ साठी सदस्य निवडत आहोत. प्रत्येक गावात (शाखा निहाय १ समाज बांधव, एक भगिनी), प्रत्येक शहरात (शाखा निहाय १ समाज बांधव, १ भगिनी) आणि प्रत्येक महानगरात (१ समाज बांधव, १ भगिनी) यांची सदस्य म्हणून निवड करण्यात येईल. एका व्यक्तीस एकाच समितीत निःस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने सदस्य म्हणून कार्य करता येईल. प्रत्येक समितीसाठी स्वतंत्र सदस्य असतील.
समिती क्र ८ मध्ये शाखा निहाय तसेच सर्व शाखीय सोनार वधु वर मेळावा आयोजक संस्था, वधु वर सूचक मंडळे, वधु वर सूचक समाज बांधव आणि भगिनी यांना सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात येईल. तसेच समिती क्र ९ मध्ये शाखा निहाय तसेच सर्व शाखीय सोनार सामुदायिक विवाह सोहळा आयोजक संस्था यांना समाविष्ट करण्यात येईल.
यावेळी कृति आराखड्यानुसार नऊ प्रकारच्या समित्यांच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा करण्यात येणार आहे.
या सहविचार बैठकीस अमळनेर येथील अधिकाधिक सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अमळनेर येथील अहिर सुवर्णकार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री गोपाळ दाभाडे, लाड सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष श्री दीपक मुरलीधरशेट पवार, अखिल वैश्य सोनार महासंघाचे महासचिव श्री संदीप भगीरथ सराफ, ज्येष्ठ समुपदेशिका सौ करुणाताई सोनार, कुटुंब समुपदेशक श्री आनंद दुसाने यांनी केले आहे.