भिवंडी : कोरोना व्हायरसमुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊन कमी अधिक प्रमाणात सुरुच आहे. लॉकडाऊनमुळे कित्येक उद्योग-धंदे ठप्प झाले आहेत. अनेक जणांच्या नोकऱ्या देखील गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बेरोजगारीतून भिवंडी तालुक्यातील करंजोटी या गावात सोन्याच्या साखळीसाठी एका कॉलेज तरुणाची हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आकाश नारायण शेलार (21) असे खून झालेल्या कॉलेज तरुणाचे नाव असून तो खडवली येथील महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत होता. कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे कॉलेज बंद आहे. शुक्रवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घरी असताना त्याला अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर कॉल करत गावालगत असलेल्या माळरानावर बोलावून घेतले. त्या ठिकाणी गेल्यावर मारेकऱ्यांनी त्याचा गळा आवळून तीक्ष्ण हत्याराने त्याची निर्घृण हत्या करण्यत आली. हत्येनंतर मारेकऱ्यांनी त्याचा मृतदेह गावानजीकच्या शेतात फेकून पलायने केले.
या घटनेप्रकरणी पडघा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पडघा पोलिसांनी गावातील मयुर मोतीराम जाधव (20) या तरुणास चौकशीकामी ताब्यात घेतले असता धक्कादायक प्रकार उघड झाला. दुचाकी घेण्यासाठी त्याला पैसे हवे होते. आकाशच्या गळ्यात एक तोळे वजनाची सोन्याची साखळी होती. सोन्याची साखळी मोडून चांगले पैसे येतील हा विचार मनात ठेवून त्यांनी आकाशला बोलावून त्याची हत्या केली. त्याच्या डोक्यात बॅट मारुन त्याला ठार करण्यात आले. हत्येनंतर आकाशच्या गळ्यातील सोन्याची चेन व मोबाईल मारेकरी मयुर घेवून फरार झाला होता.
पोलिसांनी मयुरच्या ताब्यातील मयत आकाशचा मोबाईल, सोन्याची साखळी व गुन्हयात वापरलेली बॅट जप्त केली आहे. या गुन्हयात सहभागी असलेला आणखी एक जण असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.