घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी शहरातील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास शाखेच्या वतीने घाटंजी येथे जागतिक योग दिन उत्साहात संपन्न झाला.मधुगिता योगा क्लासेस येथे १८ ते २१ जून २०२५ या कालावधीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात महिला मंडळ, सखी मंच तसेच भारतीय जनता पक्षाचा सक्रिय सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेफडो शाखा घाटंजीच्या अध्यक्षा स्वप्ना – विभाताई केशट्टीवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नेफडो संस्थेच्या महाराष्ट्र राज्याच्या महिला अध्यक्षा प्रीतीताई तोटावार तसेच त्र्यंबकजी तोटावार आदीं उपस्थित होते. या वेळी त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. योग प्रशिक्षक ॲड. रागिणी राऊत यांनीही प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले. त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपाध्यक्षा पुष्पाताई नामपेल्लीवार आणि ज्येष्ठ सदस्या संध्याताई उपलेंचवार यांनी देखील मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना प्रीतीताई तोटावार यांनी २१ जून २०२५ रोजी योग दिन साजरा करण्यामागील ऐतिहासिक व अध्यात्मिक कारण स्पष्ट केले. ‘या दिवशी दक्षिणायनाची सुरुवात होते व तो वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. भगवान शिव यांनी या दिवशी सप्तऋषींना योग दीक्षा दिली, ज्यामुळे योगाचा प्रसार जगभर झाला असल्याचे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
योग प्रशिक्षक ॲड. रागिणी राऊत यांनी योगाचे सुलभ आणि प्रभावी मार्गदर्शन करत आनंदी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी योग किती महत्त्वाचे आहे, हे उलगडून सांगितले. प्रशिक्षणार्थींनी त्यांच्या अनुभवातून हे योग प्रशिक्षण किती फलदायी ठरले, हे अधोरेखित केले.
प्रशिक्षणानंतर विविध खेळ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पूर्वी झालेल्या स्पर्धांतील विजेत्या महिलांना पारितोषिके देण्यात आली. विजेत्या महिलांमध्ये मंगला भोयर, श्रीजा पलीकुंडावार, कविता कर्णेवार आणि अनुश्री भंडारवार यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन आणि आभारप्रदर्शन स्वप्ना केशट्टीवार यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. या यशस्वी उपक्रमामध्ये सचिव पूजा उत्तरवार, सदस्या भाग्यश्री कोमावार, रूपा कोमावार, अनिता पलीकुंडावार आणि विजया पाम्पट्टीवार यांनी अथक परिश्रम घेतले.