मारहाण झाली चारचौघात, राग भरला मनात — कारने उडवले रस्त्यात, सत्य उघडले तपासात

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): मारहाण करणारा नजरेच्या टप्प्यात येताच उफाळून आलेला राग आणि सळसळते तरुण रक्त कसे जोरात काम करते याचे एक उदाहरण पोलिस तपासात समोर आले आहे. कधीकाळी चारचौघात बेदम मारहाण करणारा अचानक रस्त्याने जातांना दिसल्यानंतर त्याला कारखाली चिरडून ठार करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार स्थानिक गुन्हे शाखा आणि एरंडोल पोलिसांच्या तपासात उघड झाला आहे.

दशरथ महाजन हे एरंडोल नगरपरिषदेचे माजी उप नगराध्यक्ष आहेत. आज त्यांचे वय चाळीशीपार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते एरंडोल येथील स्थानिक राजकारणात कार्यरत आहेत. चाळीशीपार असलेले दशरथ महाजन हे साधारण दहा वर्षांपूर्वी तिशीत असतांना अगदी तरुण होते. तरुण वयात त्यांनी तेथील रहिवासी गुन्हेगार उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याला चारचौघात बेदम मारहाण केली होती. आपल्यापेक्षा वयाने अधिक असलेल्या दशरथ महाजन यांनी चारचौघात केलेली मारहाण बदकच्या जिव्हारी लागली होती. तेव्हापासून तो राग उमेश उर्फ बदकच्या मनात साचलं होता.

त्यानंतर वेळ पुढे पुढे सरकत गेला. समय बिता .. समय बदला .. समयने करवट ली.. असे म्हणता येईल. त्यावेळी मारहाण खाणारा उमेश उर्फ बदक आता एकदम तरुण झाला. त्यांच्या अंगी देखील सळसळते तारुण्य संचार करत होते. काळानुरुप निसर्ग प्रत्येकाला शक्ती आणि बुद्धी देतो. कुणाच्या मनात चांगली, कुणाच्या मनात प्रसंग, व्यक्ति आणि वेळ बघून कमी अधिक प्रमाणात कुबुद्धी देखील येते. बदकच्या बाबतीत नेमके तसेच झाले.

दिनांक 14 जून रोजी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार आणि त्याचे साथीदार शुभम कैलास महाजन व पवन कैलास महाजन असे तिघे जण कारने धरणगावच्या दिशेने मटन घेण्यासाठी जात होते. कारच्या स्टेरिंगचा ताबा उमेशकडे होता आणि त्यांचे दोघे साथीदार सोबत बसले होते. त्याचवेळी बदकची नजर रस्त्याने जाणा-या पाठमो-या दशरथ महाजन यांच्यावर अचानक पडली. काही वर्षांपूर्वी आपल्याला चारचौघात मारहाण करणारे दशरथ महाजन अचानक बदकच्या नजरेस पडताच त्याचा राग उफाळून आला. त्याने हातातील कारचे स्टेरिंग संतापाच्या भरात त्यांच्या दिशेने फिरवले. त्यांना जीवे ठार करण्याच्या उद्देशाने त्यांना डॅश मारुन बदक कारसह फरार झाला. या घटनेत दशरथ महाजन गंभीर जखमी झाले. हा रस्ता अपघात असल्याचा बनाव होईल या विचारात बदक होता.

या घटनेप्रकरणी जखमी दशरथ महाजन यांच्या सुविद्य पत्नी माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एरंडोल पोलिस स्टेशनला गु. र. न. 96/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी दशरथ महाजन हे राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांचे अनेकांशी मतभेद असल्याचा आधार घेत हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता कल्पना महाजन आणि नातेवाईकांनी पोलिसांजवळ व्यक्त केली. त्या दृष्टीने तपास पुढे सरकला. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याचा पुढील समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यानी या तपासकामी दोन पथके तयार केली. त्यात एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, हे कॉ हरीलाल पाटील, संदीप पाटील, प्रविण मांडोळे, अक्रम शेख, प्रविण भालेराव, रवि कापडणे, राहुल कोळी, जितेंद्र पाटील, भुषण पाटील यांच्यासह एरंडोल पोलिस स्टेशनचे कर्मचारी प्रशांत पाटील यांचा समावेश करण्यात आला.

या गुन्हयाच्या तपासाच्या अनुशंगाने घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास करण्यात आला. घटनास्थळाकडे जाणा-या आणि येणा-या रस्त्यांचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मात्र घटना घडली त्यादिवशी व त्यानंतर वादळी वा-यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यात विजेचे खांब वाकले होते आणि वीज प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या.

मात्र असे असले तरी तपास पथकाने एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले. तपास पथकातील हे कॉ प्रविण मांडोळे व राहुल कोळी यांनी सतत आठ तास या सीसीटीव्ही फुटेजचे परीक्षण केले. या परीक्षणात हा अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचे उघडकीस आले. सीसीटीव्ही फुटेजच्या निरक्षणानुसार बदक चालवत असलेली कार निष्पन्न करण्यात आली. घटनेच्या दिवशी आणि घटनेच्या वेळी त्या कारमधील तिघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

पोलिस चौकशीत उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार, शुभम कैलास महाजन आणि पवन कैलास महाजन या तिघांनी घटनेच्या दिवसांचा क्रम कथन करत कबुली दिली. कबुली दरम्यान उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार याने हा गुन्हा पुर्व वैमनस्यातुन केला असल्याचे सांगीतले. गुन्हा करतांना गुन्हयात वापरलेली महींन्द्रा अँड महींन्द्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी उमेश ऊर्फ बदक सुरेश सुतार यांच्या कब्जातून हस्तगत करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here