जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात 29 जून रोजी आढळून आलेल्या तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. त्याची गोळी झाडून राजकीय वैमनस्यातून हत्या झाल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. या खून प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जगदीश जुलाल ठाकरे (रा. मोरवड ता. जि. धुळे) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुभम सावंत, अशोक मराठे व एका अनोळखी तरुणाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयितांना अटक करण्यात आली आहे.
29 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाबद्दल सुरुवातीला चाळीसगांव ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली होती. मयताची ओळख पटवण्याचे काम सुरु असतांना तो धुळे जिल्ह्याच्या मोरवड येथील तो जगदीश जुलाल ठाकरे असल्याची ओळख पटली. धुळे तालुका पोलिस स्टेशनला त्याच्या हरवल्याबाबत मिसिंग दाखल करण्यात आली होती. मयत जगदीश जुलाल ठाकरे यास मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे व एका अनोळखी तरुणाने राजकीय वैमनस्यातून वाढदिवसाला जाण्याच्या बहाण्याने घरातून नेवून त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह कन्नड घाटात टाकून देण्यात आला.
चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला भाग 5 गु.र.नं. 196 /2025 बीएनएस कलम 103 (1) सह अॅट्रासिटी अक्ट अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा जळगाव तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने त्यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय अधिकारी विनायक कोते करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. संदीप पाटील, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि प्रदिप शेवाळे, पोउपनि राहुल राजपुत, चाळीसगांव ग्रामीण व शहर पोलीस स्टेशनचे पथक स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि शेखर डोमाळे, पोकॉ महेश पाटील, भुषण शेलार, चालक बाबासाहेब पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.