जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सिमेवर पारोळा हे तालुक्याचे गाव आहे. महामार्गावरील पारोळा हे गाव जळगाव जिल्ह्याच्या सिमेलगत असून येथून धुळे शहर जवळ आहे. त्यामुळे पारोळा शहर आणि तालुक्यातील लोक धुळे शहरासोबत मोठ्या प्रमाणात जोडले गेले आहेत. आपात्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा घेण्यासाठी पारोळा पोलिसांना कित्येकदा नजीकच्या धुळे येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाची मदत घ्यावी लागते. पारोळा येथील पोलिस स्टेशनचा कारभार सध्या तरुण आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी सचिन सानप यांच्या हाती आहे. यापुर्वी ते याच पोलिस स्टेशनला सहायक पोलिस निरीक्षक होते. त्यामुळे त्यांना या शहर आणि तालुक्याची चांगल्याप्रकारे माहिती आहे.

दिनांक 25 जून 2025 रोजी रात्री अकरा – साडे अकरा वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांचे सहकारी सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन, पोलिस उप निरीक्षक अमरसिंग वसावे, हे.कॉ. सुनिल हटकर, पोकॉ अभिजीत पाटील, महिला पोलिस कर्मचारी सविता पाटील असे पोलिस स्टेशनला हजर होते. त्यावेळी तालुक्यातील सुमठाणे गावचे पोलिस पाटील वालजी पोपट पाटील यांचा बहादरपूर बिट अमंलदार अशोक सातपुते यांना कॉल आला. सुमठाणे शिवारातील वन विभागाच्या जंगलात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहीती पलीकडून बोलणा-या पोलिस पाटील यांनी त्यांना दिली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित अधिकारी आणि कर्मचा-यांचे पथक घटनास्थळी सुमठाणे या गावी रवाना झाले. घटनास्थळी वन विभागाच्या निर्मनुष्य जागी जाईपर्यंत बरीच रात्र झाली. वाटेत पोलिस पाटील यांना सोबत घेण्यात आले. घटनास्थळी जंगलातील झाडाझुडूपात साधारण 35 ते 40 वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह पडलेला होता. सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन यांनी घटनास्थळी फॉरेन्सीक पथकाला बोलावून घेतले. मयत अनोळखी महिलेचा चेहरा प्लॅस्टिकच्या पोत्याने झाकलेला होता. ते पोते दूर सारताच परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरण्यास सुरुवात झाली.

अनोळखी मयत महिलेच्या कपाळ आणि डोक्यावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या. तिच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये लोखंडी धातुची रिंग होती. जवळच असलेल्या झाडाजवळ मयत महिलेच्या चपला आढळून आल्या. घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा आदी सोपास्कार झाल्यानंतर तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीकामी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात रवाना करण्यात आला. या घटनेप्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी होत अंमलदार अशोक सातपुते यांनी पारोळा पोलिस स्टेशनला 26 जुन रोजी अज्ञात मारेक-याविरुद्ध गुन्हा दाखल केला. हा गुन्हा भाग 5 गु.र.नं. 154/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 238 प्रमाणे दाखल करण्यात आला. गुन्हयाच्या तपासकामी अधिकारी वर्गाला योग्य त्या सुचना देण्यासाठी पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, डिवायएसपी विनायक कोते आदींनी भेटी दिल्या. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी आपल्या सहका-यांसह सुरु केला.
या गुन्ह्याचा तपास पुढे सरकण्यासाठी सर्वप्रथम मयत महिलेची ओळख पटवणे गरजेचे होते. त्या दृष्टीने तपासाला सुरुवात करण्यात आली. जळगावसह धुळे आणि इतर जिल्ह्यातील पोलिस स्टेशनला मयत महिलेच्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या महिलेची मिसींग दाखल आहे का याचा शोध घेण्यात आला. मात्र कुठेही तशा स्वरुपाची नोंद नसल्याचे आढळून आले. त्यामुळे महिलेची ओळख पटवण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर होते. त्यामुळे पोलिसांनी आपले कसब वापरण्यासह गुप्त बातमीदार कामाला लावले. मयत महिलेच्या पायात असलेली धातुची रिंग कोणत्या समाजातील महिला त्यांच्या प्रथेनुसार वापरतात याचा शोध घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय विविध व्हॉटस अॅप गृपच्या माध्यमातून मयत महिलेसह तिच्या अंगावरील कपडे, तिच्या हातावरील गोंदण, कानातील रिंग आदींची माहिती प्रसारीत करुन ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय मयत महिलेच्य हातातील हिरव्या काचेच्या बांगड्या व नारंगी पिवळा धागा बघता ती घटनेपुर्वी कोणत्या तरी मंदीरात दर्शनासाठी जावून आली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. तिच्या हातातील बांगड्या आणि धागा कोणत्या मंदीर परिसरात विक्री होतो त्याची देखील ओळख पटवण्याकामी माहीती घेण्यात आली. याशिवाय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली. तसेच घटनास्थळ परिसरातील मोबाईलचा डमडाटा संकलीत करण्यात आला. मात्र महिलेची ओळख पटत नव्हती.
सर्व बाजूने महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु असतांना पारोळा तालुक्यातील उंदीरखेडे या गावी राहणारी शोभाबाई रघुनाथ कोळी ही 48 वर्ष वयोगटातील महिला बेपत्ता झाल्याची कुणकुण पारोळा पोलिसांना लागली. या गाव परिसरातील गावक-यांमधे देखील हीच चर्चा सुरु होती. हाच धागा पकडून पुढील तपासाला दिशा देण्यात आली.




घटना उघडकीस आल्यानंतर तिन दिवसांनी 28 जुन रोजी दोन इसम पोलिस स्टेशनला आले. त्यातील गोपाल रघुनाथ कोळी या उंदीरखेडा येथील तरुणाने पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना सांगितले की मी तुमची शोध पत्रिका वाचली असून त्यातील नमुद महिलेचे वर्णन माझ्या बेपत्ता आईच्या वर्णनासोबत मिळतेजुळते आहे. माझी आई शोभाबाई रघुनाथ कोळी ही पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम, धुणी भांडी, झाडू पोछा करण्यासाठी जाते. मी गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय उपचारासाठी गुजरात राज्यात गेला होता. तेथून घरी परत आल्यावर मला माझी आई शोभाबाई बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. आपण प्रसारीत केलेल्या शोध पत्रीकेतील महिलेचा फोटो आणि मृतदेह मला दाखवल्यास मी ओळखू शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला मयत महिलेचा फोटो आणि मृतदेह दाखवला असता त्याने तो ओळखला. मयत महिला ही त्याची आई शोभाबाई रघुनाथ कोळी हिच होती. अशा प्रकारे मयत महिलेची ओळख पटली आणि तपासाचा निम्मा भार कमी झाला. मात्र असे असले तरी तिची हत्या कुणी केली? कशासाठी केली? हा महत्वाचा शोध घेण्याचे काम आता सुरु झाले.

मयत महिला शोभाबाई वापरत असलेल्या मोबाईल क्रमांकाचा डाटा स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संकलीत करण्यात आला. तिच्या मोबाईलचे सर्वाधिक कॉल सुमठाणे गावातीलच संशयीत अनिल गोविंदा संदानशिव या तरुणासोबत झाले असल्याची माहिती तपासात पुढे आली. त्यामुळे संशयाची सुई आता अनिल संदानशिव या तरुणावर स्थिर झाली. स्थानिक गुन्हे शाखा आणि पारोळा पोलिस स्टेशन असे संयुक्त तपास पथक अनिल संदानशिव याचा शोध घेण्याकामी सुमठाणे गावात गेले. मात्र तो गावातून फरार झाला होता. त्यामुळे त्याच्यावरील पोलिसांचा संशय अजूनच बळावला. त्याचे राहण्याचे एक निश्चीत ठिकाण नव्हते. तो कुठेही रहात असे. अनिल संदानशिव याची चेहरेपट्टी आणि शरीरयष्ठी कशी आहे हे पोलिसांना माहित नव्हते. त्यामुळे त्याला शोधायचे आणि ओळखायचे कसे हा एक प्रश्न पोलिस पथकापुढे होता. त्यामुळे त्याला ओळखणा-या एका व्यक्तीला सोबत घेण्यात आले.




पोलिस पथक डोळ्यात तेल घालून त्याच्या मागावर होते. अखेर 28 जूनच्या मध्यरात्री धुळे तालुक्याच्या जापी- शिताणे गावाच्या रस्त्यावर तो मोटार सायकलने जातांना पोलिस पथकासोबत असलेल्या व्यक्तीला तो दिसला आणि त्याने त्याला ओळखले. त्याने पोलिसांना हाच तो अनिल संदानशिव असे सांगितले. त्यामुळे पाठलाग करुन त्याची वाट अडवण्यात आली. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की गेल्या काही वर्षापासून त्याचे व मयत शोभाबाई यांचे प्रेमसंबंध होते. शोभाबाई पारोळा शहरात विविध ठिकाणी घरकाम करुन आपला चरितार्थ चालवत होती. तिला दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार होता. तिचा मोठा मुलगा नोकरी निमीत्त गुजराथ राज्यात अंकलेश्वर येथे नोकरी निमीत्त राहतो तर लहान मुलगा पारोळा येथे अल्युमिनीयम सेक्शनचे काम करतो. तिचा पती अंकलेश्वर येथे गेला असतांना ही घटना घडली.


घटनेच्या दिवशी 24 जुन रोजी शोभाबाई आणि अनिल संदानशिव या दोघांमधे बरेच फोन कॉल झाले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तो तिला उंदीरखेडा येथून नवलनगर मार्गे वन विभागाच्या जंगलात फिरायला घेऊन गेला. त्यावेळी रात्र झाली होती. शोभाबाई हिने अंगावर घालण्यासाठी बरेच दागिने करुन घेतले होते. त्या दागिन्यांवर अनिलची गेल्या अनेक दिवसांपासून नजर खिळली होती. ते दागिने आपल्याला मिळाले तर आपली आर्थिक तंगी नाहिशी होईल असा धुर्त विचार त्याच्या मनात होता. त्या विचारातून गोड बोलून तो तिला रात्रीच्या वेळी जंगलात फिरायला घेऊन गेला. त्याच्या म्हणण्यानुसार दोघांमधे वाद झाला. त्या वादातून तिने त्याला चापट मारली. त्यामुळे त्याला राग आला. त्या रागातून आणि तिच्याजवळ असलेल्या रोख रकमेसह सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या मोहात पडून जवळच पडलेला दगड उचलून त्याने तिच्या डोक्यात मारला. त्यात ती मरण पावली.
पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती कविता नेरकर, अमळनेर उप विभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, स.पो.नि. चंद्रसेन पालकर, स.पो.नि. योगेश महाजन, फौजदार अमरसिंग वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय जितेंद्र वल्टे, शेखर डोमाळे, हे.कॉ. संदीप पाटील, प्रविण मांडोळे, हरलाल पाटील, भरत पाटील, राहूल पाटील, सुनिल हटकर, महेश पाटील, शरद पाटील, पोलिस नाईक संदीप सातपुते, पोकॉ अभिजीत पाटील, चतरसिंग मेहर, महिला पो.कॉ. काजल जाधव, आशिष गायकवाड, अनिल राठोड, मिथुन पाटील, विजय पाटील, सविता पाटील, वाहन चालक मधुकर पाटील व चालक होमगार्ड भैय्यासाहेब पाटील आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पारोळा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप करत आहेत.