जळगाव : एरंडोल पोलिस स्टेशनला दाखल जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील तिघांना एरंडोल पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. मधुर अरुण बडगुजर (रा. जगवानी नगर, जळगाव), नंदू भगवान निकुंभ (रा. जुने जळगाव, जळगाव), तुषार सुनिल महाजन (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एरंडोल येथील रहिवासी असलेल्या उषाबाई बडगुजर यांच्या घरात 6 जुलैच्या मध्यरात्री तीन ते चार जणांनी प्रवेश केला होता. त्या झोपेत असतांना आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांचे हात पाय बांधून त्यांच्या अंगावरील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 6.5 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज जबरीने हिसकावून नेला होता. या घटनेप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गु.र.नं. 107/2025 भा.न्या.सं. 309(6), 3(5), 351(2), 352, 331(2), 115(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड यांच्या गुन्हे शोध पथकाने तिघांना विविध ठिकाणावरुन शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे. त्यांनी गुन्हयाची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून तीन मोबाईल व एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा त्यांच्याकडून गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरु होती.
उप विभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि निलेश गायकवाड, स.पो.निरी. शंकर पवार, पोहेकॉ अनिल पाटील, पो.ना. दिपक पाटील, पो.ना. योगेश महाजन, पो.ना. सचिन पाटील, पो.कॉ. अमोल भोसले, पो.कॉ. आकाश शिंपी, पो.कॉ. भाऊसाहेब मिस्तरी आदींनी या कामगिरीत सहभाग घेतला.







