मृतदेहाच्या अदलाबदली प्रकरणी दोघे निलंबीत

मुंबई : नाशीक व जळगाव पाठोपाठ आता मुंबई महापालिकेच्या सायन हॉस्पीटलमधे देखील मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महापालिकेने या प्रकरणात आपली चूक कबूल केली असून शवगृहातील दोघा कर्मचाऱ्यांचे तात्काळ निलंबन केले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु झाली आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासन अशा घटनेचे मुळीच समर्थन करत नसून या दुर्दैवी प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

गेल्या महिन्यात नाशिकच्या अशाच एका घटनेत मात्र रुग्णालय प्रशासनाने आपली चुक कबुल न करता ही चुक आपली नसल्याचे म्हटले होते. जळगाव येथील गोदावरी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील असाच एक प्रकार काही दिवसांपुर्वी घडला होता. मात्र या दोन्ही घटनेत अंत्यसंस्कारापुर्वीच प्रकार लक्षात आला होता.
रस्ते अपघातात जखमी व नंतर मृत झालेल्या अंकुश सुरवाडे या तरुणाचा मृतदेह रुग्णालयाने दुस-याच रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याने मृतदेहांची अदलाबदल झाली होती. अंकुशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. या प्रकारामुळे अंकुशच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घातला. रुग्णाची किडणी काढल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर यावेळी केला.

या प्रकरणी मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे की मृत व्यक्तिचे शवविच्छेदन करताना मूत्रपिंड (किडनी) काढण्यात आल्याच्या आरोप सर्वस्वी चुकीचा आहे. शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात अंकुश सुरवडे या अपघातात जखमी तरुणास २८ ऑगस्ट रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. अंकुश सुरवडे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील उपचार सुरु होते. दुर्दैवाने अंकुशचे १३ सप्टेंबरच्या सकाळी निधन झाले. योग्य त्या प्रक्रियेनुसार त्याचा मृत्देह पीएम साठी नेण्यात आला होता.

दरम्यान सायन(शीव) रुग्णालयातच हेमंत दिगंबर यांना १२ सप्टेंबर रोजी मृतावस्थेतच त्यांच्या नातेवाईकांनी दाखल केले होते. अंकुश व हेमंत या दोघा रुग्णांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी रविवारी झाली. त्यानंतर दोन्ही शव रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले होते. अंकुश सुरवाडे या तरुणाच्या नातेवाईकांनी काल सकाळीच रुग्णालय प्रशासनास कळवले होते की, दुपारी चार वाजेच्या सुमारास ते अंकुशचा मृतदेह ताब्यात घेतील.

त्याचवेळी मृत हेमंत यांचे नातेवाईक रुग्णालयात आले. त्यांनी अंकुश याचा मृतदेह हा हेमंत याचा समजून सर्व प्रक्रिया पार पाडून, पोलीसांच्या स्वाक्षरीनंतर नेण्यात आला. प्रत्यक्षात अंकुशचे शव हे हेमंत यांचे शव असल्याचे समजून सुपुर्द करण्यात आले.हेमंत यांच्या नातेवाईकांनी शव ताब्यात घेतल्यानंतर अंत्यसंस्काराचे विधीदेखील पुर्ण केले. त्यानंतर ज्यावेळी अंकुशचे नातेवाईक रुग्णालयात आले व त्यांनी शव मागणी केली त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर गोंधळ उडाला. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले तसेच किडणी काढण्यात आल्याच्या आरोपाचे खंडण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here