घाटंजी – यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतांना आर्णी तालुक्यातील रत्नापूर हे आदिवासी गाव मात्र पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे. सावळी (सदोबा) ते तळणी मार्गाला जोडणारा रत्नापूर रस्ता सध्या पावसामुळे चिखलमय झाला आहे. रत्नापूर गावातील नागरिकांना या रस्त्याने प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहने चिखलात अडकतात आणि अपघातही होतात.
आर्णी आणि घाटंजी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या रत्नापूर गावाला जोडणारा हा एकमेव कच्चा रस्ता पक्क्या रस्त्यात रुपांतरीत होण्याच्या प्रतीक्षेत आहे. रत्नापूर हे गांव दोन नद्यांच्या संगमावर असून या ठिकाणी मुबलक प्रमाणात गौण खनिज वाळू उपलब्ध होते. वाळूच्या वाहनांची या रस्त्याने रेलचेल असते. या खनिजाच्या उत्खननातून शासनाला दरवर्षी करोडो रुपयांचा महसूल प्राप्त होतो. मात्र असे असतांना या रस्त्याच्या देखभालीकडे लोकप्रतिनिधींचे का दुर्लक्ष होते याचे उत्तर ग्रामस्थ शोधत आहेत.
रत्नापूर येथील गावकऱ्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांचे कडे तक्रारी केल्या. वेळोवेळी निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र दोन्ही विभाग हा रस्ता आमच्या अखत्यारीत येत नाही असे सांगून जवाबदारी झटकत आहे. त्यामुळे या रस्त्याचं आजवर दुरुस्तीचे काम सुद्धा झालेले नाही. रत्नापूर गांव अनुसूचित जमातींसाठी राखीव असूनही आदिवासी समाजाच्या समस्यांचा कुणी दादपुकारा घेत नाही.
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मतांचा जोगवा मागण्यासाठी सर्व उमेदवार येतात. मात्र निवडणूक आटोपल्यानंतर त्यांना या रस्त्याचा विसर पडतो. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थ चिडलेले आहेत. हा रस्ता फक्त प्रवासापुरताच मर्यादित नसून शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिकेतून नेण्यात येणारे रुग्ण, गरोदर महिला अशा सर्व गरजांसाठी रत्नापूर येथील रस्ता अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक आहे. रस्त्याच्या नावावर लोकप्रतिनिधींकडून फक्त आश्वासने मिळतात. आर्णी केळापूर हा विधानसभा मतदारसंघ आदिवासी राखीव असून सुद्धा आदिवासी समाजाचे गावच रस्ते विकासांपासून वंचित आहे. लोकप्रतिनिधीने दिलेल्या आश्वासनांचा आज चिखल झाला असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.