एमआयडीसीतील बंद कंपनीत चो-या करणारा जेरबंद

On: July 15, 2025 10:16 PM

जळगाव : एमआयडीसी परिसरातील बंद अवस्थेतील दोन वेगवेगळ्या कंपन्यांमधील साहित्य चोरी करणा-या चोरट्यास जेरबंद करण्यात आले आहे. त्याच्या ताब्यातून चोरीचे विविध साहित्य, स्पेअर पार्ट्स, आणी गुन्हयात वापरलेली रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या (रा. शाहु नगर, जळगांव) असे पोलिस पथकाने ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या चार तासांच्या आत हा गुन्हा उघडकीस आला आहे.

अठरा हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या वायरचे रिल, 5600 रुपये किमतीचे पॉलीकेब नावाचे पॅकींग असलेले इलेक्ट्रिक वायरचे 7 बंडल, असे एका कंपनीतून तर दुस-या कंपनीतून चटई तयार करण्याच्या मशीनचे सुमारे 25 हजार रुपये किमतीचे नवे-जुने स्पेअर पार्ट असा एकुण 48 हजार 600 रुपये किमतीच्या मालाची चोरी झाली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या गुन्हे शोध पथकातील फौजदार राहुल तायडे यांच्यासह पोहेकॉ गणेश शिरसाळे, रामकृष्ण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे व नितीन ठाकुर यांनी गुन्हा घडला त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व नेत्रम कार्यालय येथील कॅमे-यातील फुटेज तपासले असता दोन अज्ञात महिला या एका बंद अवस्थेतील कंपनीतील सामान गोणीत भरुन चोरी करतांना आढळून आल्या.

घटनास्थळ परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली असता त्या दोघी अज्ञात महिला चोरी केलेल्या सामानाच्या गोण्या त्यांच्या साथीदारानी आणलेल्या रिक्षात भरुन नेतांना आढळून आल्या. त्या रिक्षाचा क्रमांक आणि त्यांच्या साथीदाराचे नाव निष्पन्न करण्यात आले. इमरान खान सलीम खान भीस्ती उर्फ रेपट्या या चोरट्याकडून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह चोरी केलेले सामान हस्तगत करण्यात आले.  

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील फौजदार राहुल तायडे, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोकॉ राहुल रगडे, विशाल कोळी, गणेश ठाकरे, राहुल घेटे व नितीन ठाकुर आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. यशिवाय गुन्हा उघडकीस आणण्याकामी नेत्रमचे पोलीस अंमलदार पोकॉ पंकज खडसे व पोकॉ मुबारक देशमुख यांनी पथकाला सहकार्य केले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण पाटील व पोकॉ नरेंद्र मोरे करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment