जळगाव : वन्यप्राणी काळविटाची शिकार करून त्याचे मांस व शिंगांची वाहतूक करणाऱ्या दोघांना चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे. बांगऱ्या फुसल्या बारेला व धुरसिंग वलका बारेला अशी ताब्यात घेऊन
वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलेल्या दोघा शिकाऱ्यांची नावे आहेत. वाहतूक पोलीस कर्मचारी राकेश पाटील आणि गजानन पाटील असे दोघे वाहतूक केसेस करत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईला मूर्त स्वरुप देण्यात आले.
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वनविभाग यांच्या संयुक्त कारवाईत दोघा शिका-यांना अडवून त्यांची व त्यांच्या ताब्यातील मोटर सायकलची तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्यांच्याकडे शिकार केलेला काळविटाचे मांस आणि शिंगे आढळून आली.
बोरजनंटी ते वैजापुर दरम्यान रस्त्यावर पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहाय्यक फौजदार राजु महाजन, पोहेकॉ राकेश पाटील, पोकॉ गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनिल कोळी वनविभागाचे आरएफओ विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक वी आर बारेला, वनरक्षक वानु बारेला, वनरक्षक योगेश सोनवणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. वन विभागामार्फत पुढील कारवाई करण्यात येत आहे.