आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी मापाऱ्याने खेळला लुटीचा डाव

On: July 20, 2025 10:16 PM

नाशिक – पिंपळगाव बसवंत येथील 15 लाख रुपयांच्या लुटीचा दावा करणारा मापारीच या गुन्ह्यातील बनाव रचणारा निष्पन्न झाला आहे. पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या चाणाक्ष नजरेतून आणि तपासातून हा बनाव उघडकीस आला. शेअर मार्केटसह अँटिक सीरियल नंबर असलेल्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळवण्याच्या नादात आमिषाला बळी पडून पिंपळगाव बाजार समितीतील मापारी राकेश बाविस्कर याने स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेतले. ते नुकसान भरून काढण्यासाठी त्यानेच पंधरा लाख रुपयांच्या लुटीचा बनाव केला होता.

कामगारांच्या पगाराची रक्कम घेऊन जात असताना चोरट्यांनी डोळ्यात मिरची पूड टाकून पंधरा लाख रुपयांची रोकड लुटून नेल्याचा दावा राकेश बाविस्कर याने केला होता. पोलिस तपासातील चौकशीत त्याने लुटीचा बनाव रचल्याची कबुली दिली आहे. शुक्रवार दि.18 रोजी त्याची पोलिस कोठडीची मुदत संपली होती. न्यायालयाने त्याला पुन्हा तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

राकेश बाविस्कर हा नोव्हेंबर 2024  पासून ‘मेहता इज बँक’ नावाच्या यू-ट्यूब चॅनलवरील शेअर मार्केट आणि ‘अँटीक’ नोटांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील आमिषाला बळी पडला होता. पाचशे रुपयांच्या 786 सिरीअल नंबर असलेल्या नोटेला 20 लाख रुपये व 100 रुपयांच्या सीरियल असलेल्या नोटेला एक लाख रुपये मिळतील असे सांगून त्याच्याकडून मोठी रक्कम उकळण्यात आली होती.

बाविस्कर याच्याकडे 500 रुपयांच्या पाच व 100 रुपयांच्या दोन अशा एकुण सात नोटा होत्या. संबंधित संस्थेच्या माध्यमातून बाविस्कर याच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर संस्थेचे काही सदस्य पिंपळगाव बसस्थानकाच्या गेटवर त्याला भेटले होते. बाविस्कर याने या फसव्या व्यवहारात एकूण 9 लाख 50 हजार रुपये टप्प्याटप्प्याने संबंधितांना दिले. संस्थेकडून तुमचे आयडी मॅच झाल्यावर आमचे लोक येऊन तुमच्या खात्यात पैसे जमा करतील, असे त्याला सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीही झाले नाही.

पैसे हातातून गेल्याचे लक्षात आल्यानंतर बाविस्कर याने हा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी युक्ती केली. कामगारांच्या पगाराची 15 लाख रुपयांची लूट झाल्याचे नाट्य त्याने घडवले. पोलिस तपासात, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल लोकेशन आणि इतर पुराव्यांमधून या बनावट घटनाक्रमाचा खुलासा झाला.

गुन्ह्याचा तपास करताना पिंपळगाव पोलिसांनी संशयिताकडून नोटा जप्त केल्या आहेत. संशयिताने मेहता व ममता कंपनीशी संपर्क साधल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असून त्या संस्थेची पार्श्वभूमी तपासली जात आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment